सध्या गारवा, चार दिवसांत थंडी!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई यंदा दिल्लीसारख्या हवामानाचा अनुभव घेत आहे. हवा प्रदूषण वाढले आहे. त्याचवेळी दरवर्षीपेक्षा थंडीचा कडाकाही वाढला आहे. या हवामान बदलामागे नेमके काय कारण आहे, याचा वेध घेतला आहे, कुलाबा वेधशाळेच्या संशोधक सुषमा नायर यांनी…

मुंबईत यंदा थंडीचे प्रमाण वाढले आहे का?
नाही. मुंबईत सध्या गेले काही दिवस वातावरणात गारवाच आहे. मुंबईत वातावरण 17 अंश सेल्सिअसपर्यंत गेले तरी ते नॉर्मल मानले जाते. मात्र, 17 अंश सेल्सिअसपेक्षा खाली गेले की, थंडी पडली असे म्हणता येईल. सध्या मुंबईत सकाळी तापमान 16 अंश सेल्सिअसपर्यंत गेले आहे. येत्या 14 ते 17 जानेवारीला हे तापमान अधिक घसरणार असून पारा 13 अंशापर्यंत जाऊ शकतो. दिल्लीकरांसाठी ही थंडी नसेल पण मुंबईकरांसाठी ही थंडीच आहे. मुंबईत एवढी थंडी कधीच नसते. फक्त एकदा-दोनदाच पारा 12 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला होता. मात्र, उत्तरेत अजूनही बर्फवृष्टी होत असून हवामान खात्याने काही राज्यांत शीतलहर येणार असल्याचा इशारा दिला आहे. या शीतलहरींमुळे मुंबईसह कोकणात पुढील चार दिवसांत थंडी वाढेल.

थंडीत मुंबईतील प्रदूषण पातळी वाढते का?
बरोबर आहे. इतर तीन ऋतूंच्या तुलनेत हिवाळ्यात सगळ्याच ठिकाणी प्रदूषणाची पातळी वाढलेली असते. हवेची गती कमी असल्यामुळे आणि हवा कोरडी होत असल्यामुळे हवेत प्रदूषके पसरून राहतात. गतीमान वारा नसल्यामुळे ती हवेत विखुरली जात नाहीत. ती साचून राहतात. त्यामुळे सगळीकडेच थंडीच्या दिवसात किंवा हिवाळ्यात प्रदूषणाच्या पातळीत वाढ होत असते.

आणखी किती काळ असे वातावरण राहणार?
मुंबईत सध्या तरी चांगले वातावरण आहे. सकाळी थंडी आणि दुपारीही हवेत गारवा राहणार आहे, चार दिवस थंडी वाढणार आहे. मुळात एखादा दिवस थंड किंवा उष्ण झाला तर त्या एका दिवसावरून मुंबईचा सिमला झाला किंवा मुंबई गारठली असे म्हणता येत नाही. हे फक्त एका दिवसापुरती असते. म्बुंईतली हवा प्रदूषित आहे की, नाही किंवा गुणवत्ता कशी आहे, यासाठी खूप दिवसांची सरासरी किंवा हवेची प्रदीर्घ काळ गुवणत्ता तपासणे आवश्यक आहे. तरच एखाद्या शहराला प्रदूषित किंवा प्रदूषित शहर नाही, असे म्हणता येईल.