अंधेरीच्या पूरमुक्तीसाठी पालिकेचा ‘अॅक्शन प्लॅन’, मोगरा नाल्याचे रुंदीकरण; पालिका खर्च करणार 90 कोटी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अंधेरी पश्चिम एस. व्ही. रोडसह अंधेरी सब वे आणि परिसराच्या पूरमुक्तीसाठी पालिका मोगरा नाल्याचे रुंदीकरण करणार असून आवश्यक ठिकाणी नवीन पर्जन्य जलवाहिन्याही टाकल्या जाणार आहेत. या तीन कामांसाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली असून पालिका या कामांसाठी सुमारे 90 कोटींचा खर्च करणार आहे.

मुंबई पूरमुक्त करण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवण्यात येत आहेत. यामध्ये नव्या पर्जन्य जलवाहिन्या टाकणे, असलेल्या वाहिन्यांचे रुंदीकरण, भूमिगत टाक्या आणि नाल्यांचे रुंदीकरण अशा अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. याचे सकारात्मक परिणाम या वर्षीपासूनच दिसायला सुरुवात झाली आहे. दरम्यान, अंधेरी सब वेमध्ये पावसाळय़ात दरवर्षी एस. व्ही. रोडवरील वाहतूक बंद करावी लागते. वीरा देसाई मार्ग व अन्य भागांतही मोठय़ा प्रमाणात पाणी तुंबते. या वर्षीदेखील पावसात अंधेरी सब वेमध्ये चार वेळा पाणी तुंबले होते. त्यामुळे या ठिकाणच्या वाहतुकीवर मोठा परिणाम झाला होता.

असे होणार काम

अंधेरी सब-वेमध्ये साचणारे पाणी लक्षात घेऊन पालिकेने अंधेरी पूर्वेकडून एस. व्ही. रोड, वीरा देसाईमार्गे समुद्राकडे जाणाऱया मोगरा नाल्याचे रुंदीकरण करण्यात येणार आहे, तर वीरा देसाई मार्ग आणि जे. पी. रोडवर अतिरिक्त पर्जन्य जलवाहिन्या टाकण्यात येणार आहेत. यासाठी निविदा प्रक्रिया सुरू असून ऑगस्टपर्यंत काम सुरू होण्याची शक्यता आहे. या कामांमुळे अंधेरी पश्चिमेतील अंधेरी सब-वे, जे. पी. रोड, वीरा देसाई मार्ग आणि आझाद नगर परिसराची पाणी तुंबण्यातून सुटका होणार असल्याचे पर्जन्य जलवाहिन्या विभागाचे प्रमुख अभियंता अशोक मिस्त्री यांनी सांगितले.