
पुणे शहरातील कात्रज परिसरातील मांगडेवाडीत एका तरुणाच्या डोक्यात दगड मारून खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी रात्री ही घटना घडली आहे. मोहन संपत चौंडकर (वय 32,रा.खलाटेनगर, मांगडेवाडी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्या खुनाचे कारण समजलेले नाही.
मंगळवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास मोहनच्या डोक्यात विटा आणि दगड घालून खून करण्यात आला आहे. रात्री हा प्रकार समजल्यानंतर भारती विद्यापीठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर तरुणाचा मृतदेह ससून रुग्णालयात नेण्यात आला. याप्रकरणी संशयिताची माहिती मिळाली आहे, असे सांगण्यात आले आहे. मात्र हा खून का झाला आणि तो कोणी केला हे समजू शकलेले नाही.
मोहन हा नऱ्हे येथील एका कंपनीत काम करत होता. तो घराशेजारी असलेल्या एका अर्धवट बांधकाम झालेल्या इमारतीत ओळखतील व्यक्तीसमवेत मद्यपान करत होता. बराच वेळा होऊनही तो घरी न परतल्याने त्याच्या घरच्यांनी शोध घेतला असता, तो रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळला. घटनास्थळी पोलीस उपायुक्त सागर पाटील, सहायक पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांनी भेट दिली.


























































