
सामना प्रतिनिधी । डोंबिवली
महिलांच्या सुरक्षेबाबत चर्चा झडत असतानाच आज कल्याणमध्ये दिवसाढवळ्या एका तरुणीची चाकूने भोसकून हत्या झाली. अत्यंत गजबजलेल्या बाजार समितीच्या कांदा-बटाटा मार्केटमध्ये ही थरारक घटना घडली. दोन हल्लेखोरांनी तिच्या पाठीत आणि पोटात लागोपाठ वार केले. यात तिचा तडफडून जागीच मृत्यू झाला. मृत तरुणीचे नाव सनम करोटिया (25) असे असून ती उल्हासनगरची रहिवासी आहे. पोलिसांनी अवघ्या तासाभरात बाबू ढकणी नावाच्या एका हल्लेखोराला अटक केली असून दुसरा हल्लेखोर फरार आहे. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे कल्याणवासी हादरून गेले असून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
बाजार समितीच्या आवारात आज सायंकाळी सनम आपल्या मित्रांना भेटण्यासाठी दुचाकीवरून आली. कांदा-बटाटा मार्केटमध्ये ती मित्रांची वाट पाहत दुचाकीवर बसली असतानाच पाठून आलेल्या दोघांनी तिच्यावर धारदार चाकूने प्राणघातक वार केले. पाठीत आणि पोटात सुरे भोसकल्याने सनम गाडीवरून खाली रक्ताच्या थारोळ्यात कोसळली. त्यानंतर ते दोघेही हल्लेखोर फरार झाले. बाजार समितीतील व्यापार्यांनी आणि ग्राहकांनी तत्काळ पोलिसांना कळवून सनमला जवळच्याच रुग्णालयात उपचारासाठी तातडीने नेले, परंतु डॉक्टरांनी आधीच तिचा मृत्यू झाल्याचे सांगितले.
सीसीटीव्ही फुटेजमुळे हल्लेखोर सापडला
कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात येण्यासाठी असलेल्या सर्व प्रवेशद्वारांवर सीसीटीव्ही लावले आहेत. या बाजार समितीच्या प्रत्येक दुकानावरही सीसीटीव्ही आहेत. त्यामुळे प्रत्येक सीसीटीव्हीचे फुटेज तपासून पोलिसांनी अवघ्या तासाभरात बाबू ढकणी नावाच्या हल्लेखोराला अटक केली आहे.
हल्ल्याचे कारण गुलदस्त्यात
सनमची हत्या का झाली, तिची हल्लेखोरांशी काही ओळख होती का, एकतर्फी प्रेमातून तिची हत्या झाली का की अन्य कोणते कारण आहे हे अद्याप गुलदस्त्यात असून पोलीस याबाबत कसून चौकशी करत आहेत.


























































