जमीनीच्या वादावरून सख्या व चुलत काकाने केला पुतणीचा खून

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । देवगड

देवगड तालुक्यातील कातवणेश्वर येथील प्रितम शशिकांत सावंत (35) हिला तिचा सख्खा काका विजय दत्ताराम सावंत (55), चुलत काका आनंद शंकर सावंत (42) यांनी जमीनीच्या वादावरून दगडाने ठेचून खून केल्याप्रकरणी दोन्ही संशयित आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटना मंगळवारी सांयकाळी 6.30 ते रात्रौ 12.30 वा.च्या मुदतीत घडली असून सख्या व चुलत काकाने पुतणीचा खून केल्यामुळे देवगड तालुक्यात खळबळ माजली असून नात्याला काळिंबा फासणारी घटना घडली असून सदर संशयित दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रितम शशिकांत सावंत व तिची आई जोत्स्ना शशिकांत सावंत या दोघी कातवणेश्वर येथे राहतात. तिचे सख्ये काका विजय दत्ताराम सावंत यांच्याशी कित्येक वर्षापासून जमीनीचे वाद आहेत. चुलत दिर आनंद सावंत हा प्रितम यांच्या घरी अधुनमधून कामानिमित्त घरी येत असायचा. असाच 13 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 06.30 वा. सुमारास प्रितम यांच्या घरी तो आला असता त्यांनी त्याला दिवाळी निमित्त केलेला फराळ दिला. फराळ खाउन झाल्यानंतर आनंद याने प्रितम हिला बाजुला पेडणेकर यांच्या घरी ठेवलेली तांदळाची गोण उचलण्यासाठी मला मदत कर, असे सांगून तिला घराबाहेर नेले. त्यानंतर प्रितम हिला प्राथमिक शाळेच्या बाजूला असलेल्या रामभाऊ सावंत यांच्या कलम बागेमध्ये आनंद सावंत व प्रितमचा सख्या चुलता विजय सावंत यांनी दगडाने ठेचून तिला गंभीर जखमी केले. बराच काळ उलटलानंतरही प्रितम घरी आली नाही म्हणून तिची आई जोत्स्ना हिने शेजारी असलेल्या पेडणेकर यांच्या घरी गेली असता तिथे कोणीच नव्हते. ती घरी येत असताना तिला प्राथमिक शाळेकडे प्रितमच्या ओरडण्याचा आवाज आला. मात्र प्राथमिक शाळेजवळ अंधार व गवत वाढलेले असल्यामुळे तिला काहीच दिसले नाही म्हणून ती पुन्हा घरी आली. त्यानंतर शेजारचे ग्रामस्थ व आनंद सावंत याला घेऊन शोधाशोध केली असता प्रितम जखमी अवस्थेत व्हिवळत डाव्या कुशीवर पडलेली आढळून आली. तिच्या डोक्यातून रक्त येत होते. देवगड ग्रामीण रुग्णालयामधून अधिक उपचारासाठी रुग्णवाहिकेमधून पुढील उपचारासाठी तिला कणकवली येथे खासगी रुग्णालयात दाखल केले असता तेथे उपचारादरम्यानच तिचा मृत्यू झाला.

काका विजय सावंत व चुलत काका आनंद सावंत यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली आहे. अधिक तपास कणकवली उपविभागीय पोलिस अधिकारी शिवाजी मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक सुधीर शिंदे करीत आहेत.