
सामना प्रतिनिधी । मुंबई
‘तिहेरी तलाक’ देण्याची प्रथा देशातून हद्दपार झाल्याचा ऐतिहासिक निर्णय काल आला आणि या यातनांतून गेलेल्या तमाम मुस्लीम महिलांच्या चेहर्यावर आनंद झळकला. आपल्याबाबत जे झालं ते यापुढे अन्य कुठल्याही भगिनीच्या बाबत होणार नाही. देर आये दुरुस्त आये, अशा भावनिक प्रतिक्रिया मुस्लीम महिलांनी दिल्या. वांद्रे येथील भारतीय मुस्लीम महिला आंदोलन या संस्थेच्या महिलांनी पेढे वाटून आज आनंद साजरा केला. त्या वेळी अनेक जणींनी आपल्या भावनांना वाट करून दिली.
‘तिहेरी तलाक’ या प्रथेविरोधात ‘भारतीय मुस्लीम महिला आंदोलन’ ही संस्था गेली अनेक वर्षे प्रयत्न करत आहे. तिहेरी तलाकविरोधी विधेयक काल लोकसभेपाठोपाठ राज्यसभेत संमत झाल्यानंतर संस्थेच्या कार्यकर्त्या आणि मुस्लीम महिला आज एकत्र आल्या. गेल्या अनेक वर्षांच्या प्रयत्नांना यश आल्याची भावना संस्थेच्या सहसंस्थापक नूर आपा यांनी व्यक्त केली. मुस्लीम फॅमिली लॉ करण्याच्या दिशेने ही सुरुवात असल्याचे त्यांनी सांगितले.
n पाच महिन्यांपूर्वी तिहेरी तलाक मिळालेली निलोफर सय्यद हिने ‘खूश हूं’ अशी प्रतिक्रिया दिली. भारतनगरला राहणार्या निलोफरला पाच मुले झाल्यावर नवर्याने तलाक दिला आहे. निलोफरची लहान मुलगी तीन वर्षांची आहे. नवरा नेहमी संशय घ्यायचा, मारझोड करायचा. 2015पासून घरखर्चासाठी पैसेही द्यायचा नाही. तीन वेळा तलाक बोलून त्याने माझ्याशी संबंध तोडले. वडिलांची तब्बेत बरी नव्हती म्हणून ही गोष्ट त्यांना सुरुवातीला मी सांगितली नव्हती. सर्व मानसिक त्रास मुकाटय़ाने सहन करीत होते. माझ्यावर तिहेरी तलाकचा प्रसंग आला तेव्हा कायदा नव्हता. आता कायदा आहे. चांगल्या गोष्टी व्हायच्या तेव्हाच होतात, अशी प्रतिक्रिया निलोफरने दिली.



























































