भरधाव गाडी झाडाला धडकून माय-लेकीचा मृत्यू, नगर तालुक्यातील घटना; चौघे जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भरधाव कारचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कार झाडावर धडकून माय-लेकीचा मृत्यू झाला असून, चारजण जखमी झाले आहेत. नगर तालुक्यातील निंबोडी गावात शनिवारी पहाटे ही घटना घडली आहे. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलिसांनी कारचालकावर गुन्हा दाखल केला आहे.

विनिता दीपक उघडे (वय 26), रास्वी दीपक उघडे (वय दीड वर्षे, दोघी रा. मुलुंड ईस्ट, मुंबई) अशी मृतांची नावे आहेत, तर दीपक सुधाकर उघडे (वय 30) यांच्यासह प्रथमेश कनोजिया आणि त्यांची पत्नी व मुलगी (नावे नाहीत) जखमी झाले आहेत. दीपक उघडे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस कर्मचारी अमोल आव्हाड यांनी फिर्याद दिली आहे.

दीपक उघडे हे पत्नी, मुलगी आणि कनोजिया कुटुंबासह बीड येथून रेनॉल्ट क्विड गाडीतून मुंबईकडे जात होते. नगर तालुक्यातील निंबोडी गावात त्यांचा कारवरील ताबा सुटला आणि गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या लिंबाच्या झाडाला धडकली. अपघाताचा आवाज ऐकून परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी दाखल होत तत्काळ मदतकार्याला सुरुवात केली.

घटनेची माहिती मिळताच भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींना नगर जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले. मात्र, विनिता आणि रास्वीचा जागीच मृत्यू झाला होता. घटनेची माहिती त्यांच्या नातेवाईकांना दिल्यानंतर ते नगरच्या दिशेने निघाले आहेत. यातील जखमींवर जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू असून, यातील एकाची परिस्थिती गंभीर आहे.