हेअर स्ट्रेटनिंगमुळे केस गळाले; नैराश्यातून बीबीएच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । म्हैसूर

हेअर स्ट्रेटनिंग केल्यानंतर केस गळण्याची समस्या वाढल्याने म्हैसूरमधील एका बीबीएच्या विद्यार्थिनीने नदीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे. नेहा गंगमा असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. काही दिवसांपूर्वी शहरातील एका पार्लरमधून तिने हेअर स्ट्रेटनिंग करत केस सरळ करून घेतले होते. त्यानंतर सातत्याने तिचे केस गळत होते. आपले सगळे केस गळून पडतील या भीतीने नेहाने आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. नेहाच्या आई-वडिलांनी पार्लरविरोधात तक्रार दाखल केली आहे.

हेअर स्ट्रेटनिंग केल्यानंतर केस पातळ झाले आहेत आणि गळत असल्याचे नेहाने मला फोन करून सांगितले होते, असे तिची आई म्हणाली. आपले सगळे केस गळतील अशी भीती तिला सतावत होती. हेअर स्टाइल बदलल्यानंतर तिला अॅलर्जीही झाली होती. त्यामुळे तिच्या त्वजेवर डाग दिसत होते. त्यामुळे ती कॉलेजमध्येही जात नव्हती. सगळे केस परत येत नाही तोपर्यंत कॉलेजात जाणार नसल्याचे नेहाने सांगितल्याचे तिची आई म्हणाली. एखाद्या धर्मस्थळी जाऊन मुंडन करण्याचा विचारही तिच्या मनात आला होता. गळणाऱ्या केसांमुळे तिचे नैराश्य वाढले होते. त्या नैराश्याच्या भरातच तिने आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले.

म्हैसूरमधून २८ ऑगस्टपासून नेहा बेपत्ता झाली होती. ती परत आली नसल्याने याबाबत पोलिसांनी कळवण्यात आले. नेहा बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या आईवडिलांनी दाखल केली होती. पोलिसांना १ सप्टेंबरला लक्ष्मणतीर्थ नदीजवळ नेहाचा मृतदेह सापडला. नेहाच्या केसाचे नमुने न्यायवैद्यक तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. नेहाने हेअर स्ट्रेटनिंग केल्याने त्यात वापरलेल्या केमिकलमुळे तिचे केस गळत होते. त्यामुळे या पार्लरविरोधात तिच्या आई-वडिलांनी तक्रार दाखल केली आहे.