
सामना प्रतिनिधी। नगर
श्रीगोंदा शहरातील कापसेवस्ती बंधारा येथे राहणाऱ्या एका शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली. अनिल कृष्णाजी गाडेकर (५२) असे त्यांचे नाव आहे. गाडेकर यांच्यावर तीन लाखाचे कर्ज होते. पण ते फेडणे अशक्य झाल्याने ते निराश झाले होते. सोमवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास गाडेकर यांनी त्यांच्या घराजवळील लिंबाच्या झाडाच्या फांदीला गळफास लावून आत्महत्या केली. कर्जबाजारीपणाला कंटाळूनच त्यांनी आयुष्य संपवल्याचे गाडेकरांच्या नातेवाईकांनी सांगितले आहे.
श्रीगोंदा शहरातील कापसेवस्ती बंधारा येथे राहणारे गाडेकर यांच्यावर सोसायटीचे तीन लाख रुपये कर्ज होते. सरकारच्या कर्जमाफी योजनेचा लाभ मिळण्यासाठी गाडेकर यांनी खाजगी सावकाराकडून दोन लाख रुपये कर्ज काढून सोसायटीचे कर्ज भरले होते. पण त्यांना सरकारच्या कर्जमाफीचा लाभ तर भेटला नाहीच पण खाजगी सावकाराच्या कर्जाचे व्याज वाढत गेले त्याला कंटाळूनच गाडेकर यांनी आपली जीवनयात्रा संपवल्याचा आरोप मयत अनिल गाडेकर यांच्या नातेवाईकांनी केला आहे.






























































