तालुक्यातील आढळा खोर्यातील देवठाण येथील 1 हजार 60 दशलक्ष घनफूट क्षमतेचे आढळा धरण शंभर टक्के भरले. शुक्रवारी सकाळी 6 वाजेपर्यंत या धरणाचा पाणीसाठा 1044 दशलक्ष घनफूट झाला. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे धरण पूर्ण भरले आणि सांडव्यावरून ओव्हर फ्लो झाले. आढळा धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर अकोले व संगमनेर तालुक्यातील धरणाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांसह नागरिकांनी आनंद व्यक्त केला.
पुढील काही दिवसांमध्ये पाणलोट क्षेत्रात पाऊस वाढण्याची चिन्हे आहेत. या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाडोशी व सांगवी लघू पाटबंधारे तलाव आहेत. ही दोन्ही जलाशय पूर्ण भरल्यानंतर आढळा धरणाचा पाणीसाठ्यात वाढ झाली. या धरणाच्या लाभक्षेत्रात 3914 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येते. त्यात अकोले तालुक्यातील 7, संगमनेर तालुक्यातील 8 व सिन्नर (जि.नाशिक) तालुक्यातील एक अशा एकूण 16 गावांचे 3 हजार 914 हेक्टर सिंचनक्षेत्र आहे. सांडव्यावरून नदीच्या पात्रात पाणी वाहू लागताच देवठाण, हिवरगाव, वीरगाव, गणोरे, पिंपळगाव निपाणी, डोंगरगाव येथील शेतकऱ्यांनी पेढे वाटून आनंद व्यक्त केला.