
रधाव कंटेनर दुचाकीवर उलटल्याने कंटेनरखाली दबून दुचाकीवरून जाणाऱया माय-लेकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना नगर-पुणे महामार्गावरील श्रीगोंदा तालुक्यातील गव्हाणवाडी शिवारात रविवारी पहाटे घडली आहे. मृत मायलेक हे पारनेर तालुक्यातील राळेगणसिद्धीचे रहिवासी आहेत. स्वप्नील ऊर्फ बंडू बाळू मापारी (वय 27) व त्यांची आई लक्ष्मीबाई बाळू मापारी (वय 62) अशी मृतांची नावे आहेत.
स्वप्नील आणि त्याची आई लक्ष्मीबाई हे शिरूर येथून कांदा विकून राळेगणसिद्धीला परतत होते. तर, कंटेनर पुण्याच्या दिशेला जात होता. हा भरधाव कंटेनर दुभाजक तोडून समोरून येणाऱया दुचाकीवर उलटला. या कंटेनरखाली दबून स्वप्नील आणि लक्ष्मीबाई यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर महामार्गावर मोठय़ा प्रमाणात वाहतूककोंडी झाली होती. क्रेनच्या साहाय्याने कंटेनर बाजूला काढून मृतदेह बाहेर काढण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच रांजणगाव आणि शिरूरचे पोलीस कर्मचारी राळेगणसिद्धीचे माजी सरपंच लाभेश औटी, सुनील हजारे, सुरेश पठारे, गणेश पोटे आदींनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले.
कांदा विकून परतताना काळाने घातला घाला
स्वप्नील व त्याची आई हे दोघे पहाटेच कांदा विक्रीसाठी राळेगणसिद्धी येथून शिरूर (पुणे) येथे गेले होते. कांदा विक्री करून ते राळेगणसिद्धीकडे परतत असताना हा अपघात झाला. दोन वर्षांपूर्वी स्वप्नीलचा विवाह झाला होता. या दुर्घटनेमुळे राळेगणसिद्धी पंचक्रोशीत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. शोकाकुल वातावरणात दोघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.



























































