
नगर अर्बन मल्टिस्टेट शेडय़ुल्ड बँकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून, संचालक मंडळाच्या 18 जागांसाठी 28 नोव्हेंबरला मतदान होणार आहे, तर 30 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. तब्बल दोन वर्षांनी ही निवडणूक होत आहे.
गैरव्यवहारामुळे नगर अर्बन बँक गेल्या काही वर्षांपासून चर्चेचा विषय राहिली आहे. बँकेतील गैरव्यवहाराबाबत पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल आहेत. 2019 मध्ये या बँकेची निवडणूक अपेक्षित होती. मात्र, बँकेचा एनपीए वाढल्यामुळे रिझर्व्ह बँकेने संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासकाची नियुक्ती केली होती. बँकेवर सुमारे दोन वर्षांपासून ‘प्रशासक राज’ सुरू आहे. या निवडणुकीमुळे आता ‘प्रशासक राज’ संपणार आहे.
जिल्हा उपनिबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी दिग्विजय आहेर यांनी आज सकाळी प्रारूप मतदार यादी जाहीर केली आहे. 28 नोव्हेंबरला मतदान होणार असून, 30 नोव्हेंबरला मतमोजणी केली जाणार आहे. निवडणुकीचा अधिकृत निकाल 1 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता जाहीर केला जाईल. बँकेच्या 18 जागा असून, त्यासाठी उमेदवारी अर्ज विक्री व स्वीकृतीसाठी 26 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबरपर्यंतची मुदत आहे. 3 नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात येणार आहे. वैध उमेदवारी अर्जांची यादी 8 नोव्हेंबरला प्रसिद्ध केली जाणार असून, 15 नोव्हेंबरला उमेदवारांना चिन्हांचे वाटप केले जाणार आहे.
दरम्यान, बँकेच्या संचालक मंडळाची यापूर्वी 2014 मध्ये निवडणूक झाली होती. या निवडणुकीत 48 हजार मतदार होते. माजी खासदार दिवंगत दिलीप गांधी व दिवंगत सुवालाल गुंदेचा यांच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनल तसेच सुभाष भंडारी व राजेंद्र गांधी यांच्या नेतृत्वाखालील जनसेवा पॅनल यांच्यात लढत झाली होती. या निवडणुकीत गांधी व गुंदेचा यांच्या पॅनलने बँकेवर एकहाती सत्ता मिळविली होती.
प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध; 55 हजार 991 मतदार
प्रारूप मतदारयादी आज प्रसिद्ध करण्यात आली असून, 55 हजार 991 मतदारांचा यात समावेश आहे. 1 हजाराचे शेअर्स असणाऱयांना मतदानाचा अधिकार आहे. 2014 साली 48 हजार 677 मतदार होते. त्यात यंदा 7 हजार 314 मतदार वाढले आहेत. राज्याबाहेर अहमदाबाद व सूरतमध्ये 398 सभासद आहेत. प्रशासकांनी दोन महिन्यांपूर्वी बँकेच्या 47 शाखांपैकी 6 शाखा आर्थिक तोटय़ामुळे बंद केल्या आहेत. दौंड, चंदननगर, चाकण, सिन्नर, कोपरगाव, शिर्डी या 6 शाखा बंद झाल्या आहेत.
18 जागांसाठी निवडणूक
मनपा व भिंगार छावणी मंडळ मतदारसंघ (12 जागा) – त्यात 1 महिला राखीव, 1 अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती राखीव, महाराष्ट्र राज्य मतदारसंघ (5 जागा) – त्यात 1 महिला राखीव, महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत्राबाहेरील मतदारसंघ (1 जागा).
निवडणुकीचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे
उमेवारी अर्ज विक्री व स्वीकृती – 26 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर
उमेदवारी अर्जांची छाननी – 3 नोव्हेंबर
वैध उमेदवारांची यादी – 8 नोव्हेंबर
चिन्हवाटप – 15 नोव्हेंबर
मतदान – 28 नोव्हेंबर
मतमोजणी – 30 नोव्हेंबर




























































