
नगर शहराच्या वाढत्या लोकवस्तीचा विचार करून केंद्र सरकारने नगर शहराला अमृत पाणी योजना मंजूर केली होती. आता या योजनेचे काम पूर्ण झाले असून, ‘अमृत’चे पाणी वसंत टेकडी येथील 50 लाख लिटर टाकीमध्ये पडले आहे. अखेर नगरकरांची पाण्याची प्रतीक्षा संपली असून; शहराला पूर्ण दाबाने पाणीपुरवठा करण्याचे नियोजन केले जाणार आहे.
नगरमधील बहुप्रतिक्षित ‘अमृत पाणी योजने’चे काम पूर्णत्वास गेले असून, मुळा धरण ते नगर शहरातील वसंत टेकडीपर्यंत 34 किलोमीटरपर्यंत 1100 मि.मी. व्यासाची पाईपलाईन टाकण्यात आली आहे. या योजनेचे काम सुरू असताना अनेक अडथळे आले होते ते सर्वांच्या सहकार्यातून मार्गी लागले. पुढील 40 वर्षांचा विचार करून ही योजना पूर्ण झाली आहे. विळद पंपिंग स्टेशन येथे 45 दशलक्ष लिटरच्या नवीन जलशुद्धीकरण केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. याच ठिकाणी पंप हाउस, विद्युत सबस्टेशन उभारण्यात आले आहे. याचबरोबर 600 अश्वशक्तीचे तीन पंप बसवण्यात आले आहेत. दोन पंप चालू ठेवण्यात येणार असून, एक पंप स्टॅण्डबाय राहणार आहे. शहराच्या विकासाचे प्रश्न मार्गी लागत असून, ‘अमृत पाणी योजने’मुळे शहराच्या विकासाला चालना मिळेल, असे प्रतिपादन उपमहापौर गणेश भोसले यांनी केले.
मुळा धरण ते विळद पंपिंग स्टेशन ते वसंत टेकडीपर्यंत ‘अमृत पाणी योजने’चे काम पूर्ण झाले आहे. याची चाचणी यशस्वी होऊन टाकीत पाणी पडले आहे. याची पाहणी उपमहापौर गणेश भोसले, आयुक्त डॉ. पंकज जावळे, स्थायी समितीचे सभापती गणेश कवडे, माजी विरोधी पक्षनेते संजय शेंडगे, उपायुक्त यशवंत डांगे, नगरसेवक श्यामआप्पा नळकांडे, जलअभियंता परिमल निकम आदी उपस्थित होते.
जलअभियंता परिमल निकम म्हणाले की, ‘अमृत पाणी योजने’च्या जलवाहिनीची चाचणी यशस्वी झाली आहे. चाचणीदरम्यान आलेले अडथळे दूर करण्यात आलेले आहेत. त्यामुळे येत्या आठ ते दहा दिवसांत नागरिकांना या योजनेतून पाणी मिळणार आहे. शहरातील आधीच्या जलवाहिन्यांमधून अमृतचे पाण्याचे वितरण केले जाणार आहे, असे ते म्हणाले.
सर्व भागात पूर्ण दाबाने पाणी देण्याचे नियोजन – आयुक्त जावळे
आयुक्त डॉ. पंकज जावळे म्हणाले की, अमृत जलवाहिनीच्या चाचणीचे काम अंतिम टप्प्यात असून, वसंत टेकडी येथील टाकीत योजनेचे पाणी आले आहे. उर्वरित किरकोळ कामे अंतिम टप्प्यात आहेत. येत्या आठ ते दहा दिवसांत ही योजना कार्यान्वित होऊन नगरकरांना या योजनेचे पाणी मिळेल. योजना कार्यान्वित झाल्यानंतर शहरातील सर्व भागात वेळेवर आणि पूर्ण दाबाने पाणी देण्यासाठी नियोजन केले जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.




























































