बंदुकीच्या धाकावर सराफच्या दुकानात लूट, 15 तोळे दागिने घेऊन आरोपी फरार

नालासोपारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी सराफच्या दुकानावर दरोडा टाकल्याची घटना घडली आहे. एका अज्ञात इसमाने बंदुकीच्या धाकावर दुकानाती 15 तोळे दागिने लुटले. या घटनेनंतर आरोपी फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

नालासोपाराच्या पश्चिमेला असलेल्या पाटणकर परिसरातील नेकलेस ज्वेलरचे दुकान आहे. या दुकानात शनिवारी दुपारी 25 वर्षाचा इसम आला होता. त्याने दुकानदाराला सोन्याचे नाणी विकत घ्यायचे असल्याचे सांगितले. दुकान मालकाने सोन्याची नाणी विकत नसल्याचे सांगितले. यावेळी माझ्या बहिणीला सोन्याचे दागिने सुद्धा खरेदी करायचे आहेत म्हणून इतर सोन्याचे दागिने दाखवा असे सांगत दुकानदाराला बोलण्यात गुंतवून ठेवले. आणि दरम्यान खिशातील पिस्तूल काढून दुकानदाराला पिस्तूलचा धाक दाखवत दागिने लुटण्यास सुरवात केली. पण या इसमाच्या हातातील पिस्तूल नकली असल्याचे जेव्हा दुकानदाराला लक्षात आले, तेव्हा त्याने त्याला विरोध केला. दोघांमध्ये झाटापटी झाली, आणि चोराने दुकानदाराला ढकलून दुकानातून पोबारा केला. यावेळी त्याने 15 तोळे सोन्याचे दागिने लुटून नेल्याचे दुकानदाराने पोलीस फिर्यादित सांगितले आहे.

याबाबत माहिती देताना नालासोपारा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सुपे यांनी माहिती दिली की, लुटारू इसम तोंडावर मास्क लावून आला होता, त्याने त्याची बहीण येणार असल्याचे सांगत दुकानात अर्धा ते पाऊण तास काढला जेव्हा दुकानात दुकान मालकसह कुणी नसल्याचे पाहत के कृत्य केले आहे. पोलिसांनी घटना स्थळावरून सिसिटीव्ही ताब्यात घेतले असून आरोपीचा शोध सुरु आहे असे सांगितले.