
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीमध्ये समाविष्ट होण्याबाबत मीडियासमोर चर्चा करू नये, ठोस प्रस्ताव द्यावा, असा सल्ला कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज दिला.
नाना पटोले यांनी आज ‘मातोश्री’ निवासस्थानी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या वेळी त्यांची विविध मुद्दय़ांवर चर्चा झाली. भेटीनंतर पटोले यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीमध्ये समाविष्ट होण्यात कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून अडवणूक होत असल्याचा आरोप केला होता. त्यासंदर्भात त्यांना माध्यमांनी विचारले होते. त्यावर प्रकाश आंबेडकर हे महान नेते आहेत, त्यांच्याबद्दल वायफळ चर्चा कॉंग्रेस करणार नाही, असे पटोले म्हणाले.
काँग्रेसची लगाम ही कॉंग्रेस पक्षश्रेष्ठींच्याच हातात आहे. ती इतर कुणाच्याही हाती नसते, असे पटोले या वेळी म्हणाले. एकीकडे देश वाचवण्यासाठी इंडिया आघाडीत घ्या, असे प्रकाश आंबेडकर म्हणतात. पण दुसरीकडे कॉंग्रेसवर असे आरोप करत देश खाईत टाकायचे काम चाललेय का, या प्रश्नाचे उत्तरही त्यांनी दिले पाहिजे, असे पटोले म्हणाले. कॉंग्रेसने इतकी वर्षे देशाचे संविधान सांभाळले, लोकशाही सांभाळली. आज देशाचे संविधानच संपत चालले आहे. त्यामुळे, असे फालतूचे आरोप करण्यात काहीही अर्थ नाही, असेही पटोले म्हणाले.
जिंकेल त्याची जागा
उद्धव ठाकरे यांच्यासोबत आगामी लोकसभा निवडणुकीतील जागा वाटपाबाबत चर्चा झाली का असेही माध्यमांनी या वेळी पटोले यांना विचारले. त्यावर लोकसभा निवडणुकीसाठी आम्ही वेळोवेळी आढावा घेतच असतो आणि भाजपाला हरवायचे असेल तर भाजपाविरुद्ध जो जिंकेल त्याला उमेदवारी द्यायची अशी भूमिका महाविकास आघाडीने घेतली आहे, असेही पटोले यांनी स्पष्ट केले.



























































