
विजय जोशी, नांदेड
संपूर्ण राज्याला हदरवून सोडणाऱ्या पोलीस भरती घोटाळ्याप्रकरणी नांदेड पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केलं आहे. या दोफारोपपत्राचे वजन जवळपास २ किलोचे आहे. भरती घोटाळ्यात आत्तापर्यंत २३ आरोपींना अटक करण्यात आली असून ५ आरोपी अजूनही फरार आहेत.
नांदेडच्या पोलीस भरती प्रक्रियेत १३ विद्यार्थ्यांना ९३ पेक्षा जास्त गुण मिळविले असे १३ विद्यार्थी होते. यामुळे या विद्यार्थ्यांवर संशय निर्माण झाला होता. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणी चौकशी केली असता हा सगळा घोटाळा समोर आला. या विद्यार्थ्यांना मदत करणाऱ्या प्रविण भटकर, शेख महेबुब शेख आगा, स्वप्नील दिलीप साळुंखे, नामदेव बाबुराव ढाकणे, शुक्राचार्य बबन टेकाळे अशा २० जणांविरूद्ध दि. २५ एप्रिल २०१८ रोजी नांदेडच्या वजिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात परिक्षार्थींना मदत केल्याचा आरोप असलेल्या सिंधदुर्ग जिल्ह्यातील पोलिस निरीक्षक राजेंद्र दिनकर गुरव आणि कैलास रूस्तम काठोरे या परिक्षार्थ्याला अटकपूर्व जामीन मिळाला आहे.
दोषारोप पत्रामध्ये प्रविण दत्तात्रय भटकर, शेख महेबुब शेख आगा, राजेंद्र विनकर गुरव, कैलास रूस्तुम काठोरे, अभिजीत उर्फ बंटी, गणपतराव वाकोडे या पाच जणांना फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम २९९ प्रमाणे फरार दाखवण्यात आलं आहे. या प्रकरणातील फरार आरोपींपैकी शेख महेबूब शेख आगा हे भारतीय सैन्य दलात कार्यरत असल्याची खात्रीलायक माहिती प्राप्त झाली आहे. आगा यांचे सासरे माजी मुख्याध्यापक शेख फकीर शेख छोटेमियाँ यांना हिंगोली येथून अटक झाली होती, त्यांच्याकडून २६ लाख, बबन टेकाळेकडून १५ लाख आणि शिरीष अवधूतकडून ४ लाख असे जवळपास ४६ लाख रूपये पोलिसांनी जप्त केले आहेत. या प्रकरणात दोन जणांची अटकपूर्व जामीन झाला असल्याने त्यांच्यावर स्वतंत्र दोषारोप पत्र दाखल करण्यात येईल असेही सांगण्यात आली. त्यामुळे फरार आरोपींची संख्या प्रत्यक्षात तीनच राहिली आहे. दोघांना अटकपूर्व जामीन मिळाला याची माहिती पोलिसांना असताना सुद्धा पोलिसांनी त्या दोघांना फरार आरोपीच्या रकाण्यात दाखविले याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.































































