रामपूर शिवारात चक्क गांजाचीच शेती, स्थानिक पोलीस, एलसीबीचा छापा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । किनवट 

तालुक्यातील रामपूर शिवारात गावकऱ्यांनी संगनमताने चक्क गांजाचीच शेती केल्याची माहिती मिळाल्यावरुन स्थानिक पोलिसांसह नांदेडच्या स्थानिक गुन्हे शाखेने शुक्रवारी सायंकाळी सदर शिवारात छापा टाकला. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत कारवाई सुरु होती. कारवाईत लाखो रुपयांचा गांजा जप्त होण्याची शक्यता आहे.

किनवटपासून २५ किलोमीटर अंतरावर तेलंगणा सीमेवर असलेल्या व डोंगरदरीत वसलेल्या रामपूर गावातील शिवारात गावकऱ्यांनी गांजाची शेती केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीवरून स्थानिक पोलीस निरीक्षक दिलीप तिडके यांच्या पथकासह नांदेडच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी सायंकाळी डोंगरदरीचे जवळपास ३ किलोमीटर पायी अंतर पार करुन रामपूर शिवारात छापा टाकला. यावेळी एक- दोन नव्हे, तर अख्या गावानेच शिवारात गांजाची शेती केल्याची बाब पोलिसांच्या निदर्शनास आली.गावात पोलीस आल्याची खबर लागताच गांजा लागवड करणाऱ्यांनी गावातून पळ काढला. अंधारामुळे छापा कारवाईत व्यत्यय आला. गावातील शिवारात लाखो रुपये किमतीचा किमान २ ट्रक गांजा असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. रात्री उशिरापर्यंत कारवाई सुरुच होती.