नांदेड तालुक्यातील झरी येथील खदानीमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या पाचपैकी चार तरुणांचा बुडून मृत्यू झाला. एक तरुण वाचला आहे. पोलिसांनी जीवरक्षक दलाची मदत घेऊन चार तासांच्या अथक परिश्रमानंतर मृतदेह बाहेर काढले.
देगलूर नाका परिसरात राहणारे पाच तरुण आज सकाळी स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाच्या शेजारी असलेल्या झरी येथील गणेश विसर्जनाच्या खदानीमध्ये पोहण्यासाठी गेले. पाण्याचा अंदाज न आल्याने चार जण बुडाले. घटनेचे वृत्त समजताच अतिरिक्त पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, पोलीस उपअधीक्षक सुशीलकुमार नायक, सोनखेडचे पोलीस निरीक्षक पांडुरंग माने आणि त्यांचे सहकारी घटनास्थळी पोहचले. जीवरक्षक दलाच्या कार्यकर्त्यांची मदत घेत तब्बल चार तासानंतर चौघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. मृतात देगलूर नाका परिसरातील शेख फुजाईल, मुज्जमील काझी, आफान, सय्यद सिद्दीकी यांचा समावेश असून, ते १८ ते २१ वयोगटातील आहेत. यातील पाचवा तरुण मोहम्मद फयझान हा सुदैवाने वाचला. त्यानेच मृत झालेल्या तरुणांची नावे सांगितली.
खदानीमधील पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने हे चारही तरुण बुडाल्याचे पोलिसांनी सांगितले. चौघांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात आणण्यात आले आहेत. यासंदर्भात सोनखेड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस निरीक्षक पांडुरंग माने पुढील तपास करत आहेत.