Nanded news – हेचि फळ काय मम गद्दारीला! आमदाराच्या विरोधात कार्यकर्त्यानेच दंड थोपटले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मिंधे गटात सध्या काय चालले आहे हे कळायला मार्ग नाही. कुणाचाच कुणाला पायपोस राहिला नाही. आमदाराच्या विरोधात कार्यकर्त्यानेच दंड थोपटले आहेत ! मिंधे गटाचे आमदार आनंदराव पाटील बोंढारकर यांच्या मतदारसंघातील विकास कामांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांच्याच पक्षाच्या धर्मवीर आनंद दिघे विचार मंचाचे पवन बोरा यांनी केली आहे. शिवसेनेशी गद्दारी करून भाजप आणि अशोक चव्हाणांच्या मेहेरबानीवर आमदार झालेल्या आनंदराव बोंढारकरांवर ‘हेचि फळ काय मम गद्दारीला’ असे म्हणण्याची वेळ आली आहे.

शिवसेनेसोबत दगाबाजी करून मिंधे गटात बेडुकउडी मारणारे आनंदराव बोंढारकर यांना भाजप आणि अशोक चव्हाणांच्या कृपेने आमदारकीची लॉटरी लागली. मात्र निवडून येताच बोंढारकर यांना सत्तेची बाधा झाली. गुत्तेदार, भूमाफिया, भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या चांडाळचौकडीत ते रमले. यामुळे सर्वसामान्य कार्यकर्ता त्यांच्यापासून दुरावत गेला. नांदेड दक्षिण मतदारसंघात करण्यात आलेल्या विकास कामांमध्ये झालेल्या प्रचंड भ्रष्टाचारामुळे सर्वसामान्यांमध्ये असंतोष आहे.

धर्मवीर आनंद दिघे विचार मंचाचे पवन बोरा (शर्मा) यांनी आमदार आनंदराव पाटील बोंढारकर यांच्याविरुद्ध शड्डू ठोकला आहे. बोरा यांनी बोंढार येथील प्रतिज्ञा मतिमंद विद्यालयात सुरू असलेल्या अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आणला आहे. विद्यार्थ्यांच्या पटसंख्येत असलेला घोळ, शाळेला सुरक्षा रक्षक नसणे, पिण्याच्या पाण्याची सोय नाही, विद्यार्थ्यांचा आहार याची पोलखोल बोरा यांनी केली आहे. आमदार बोंढारकर हे या शाळेचे उपाध्यक्ष असून, त्यांनी समाज कल्याण विभागावर दबाव आणून हे प्रकरण दडपले आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनाही पवन बोरा यांनी निवेदन दिले असून, त्यात नांदेड दक्षिण मतदारसंघाच्या लोहा तालुक्यातील दगडगाव, अंबेसांगवी, खंडोबा मंदिर, सोनखेड, येवला, पिंपळगाव, पिंपरण खंडी येथील सामाजिक सभागृहाच्या बांधकामात प्रचंड मोठा घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे. तसेच पळशी, भेंडगाव येथील सीसी रोड कामात टेस्ट रिपोर्ट, वर्क ऑर्डर होऊनही हे काम सुरू झाले नाही. पुरातत्त्व विभागाची परवानगी न घेता आंबेसांगवी येथील प्राचीन दत्त मंदिराचे काम सुरू आहे. या कामातही मोठ्या प्रमाणावर अफरातफर असून, या सर्व कामांची त्रिस्तरीय समिती नेमून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी बोरा यांनी केली आहे.