भाजप नेत्यांच्या गटबाजीमुळे कार्यकर्त्यांची गोची

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भूषण पारळकर। नांदेड

जिल्हा परिषद सदस्या डॉ.मीनल खतगांवकर यांच्या नायगांव येथील संपर्क कार्यालयाचा उद्घाटन सोहळा भाजपच्या गटबाजीला प्रोत्साहन देणारा ठरला. पक्षातील अनेकांना डावलून घेण्यात आलेल्या या व्यक्तीकेंद्रीत समारंभात पक्षापेक्षा नेत्यांचाच जास्त उदो उदो झाल्याने हा सोहळा म्हणजे मतलबी भाजपा पुढाऱ्यांचे संकुचित व्यासपीठ बनल्याची रंगतदार चर्चा सुरु झाली आहे.

प्रचंड गटबाजीने ग्रासलेल्या भाजपाची सध्या नायगांव मतदार संघात रात्र कमी अन् सोंग जास्त अशी अवस्था झाली असून प्रदेश उपाध्यक्ष भास्करराव खतगांवकर व प्रदेश सदस्य राजेश पवार यांच्यातील पक्षांतर्गत संघर्षाने कार्यकर्त्यांची गोची झाली आहे. एकमेकांना वगळून होणारे कार्यक्रम व सोशल मिडियावरची दर्जाहीन शेरेबाजी यातून दोघांच्याही समर्थकात पेटलेला राजकीय संघर्ष चर्चेचा विषय ठरत आहे.

अशा परिस्थितीत खतगांवकरांच्या स्नुषा तथा रामतीर्थ सर्कलच्या जि.प.सदस्या डाँ.मीनल खतगांवकर यांच्या नायगांव येथील संपर्क कार्यालयाचा विधानसभा प्रभारी आमदार विनायक पाटील यांच्या हस्ते शनिवारी शुभारंभ झाला. मुत्सद्दी खतगांवकरांनी यानिमित्ताने प्रदेश सदस्य राजेश पवार व मराठवाड्यात सर्वाधिक मतांनी विजयी झालेल्या जि.प.सदस्या पूनम पवार या सक्रिय दाम्पत्यांला वगळून भव्य बँनरबाजी करत मेळावा घेतला.

यावेळी उपस्थित माजी मंत्री किन्हाळकर वगळता बहुतांश नेत्यांनी पक्षापेक्षा खतगांवकर यांचेच गोडवे गाण्यात धन्यता मानली. मोजक्या वक्त्यांनाच भाषणाची संधी दिल्याने काही पुढाऱ्यांनी कार्यक्रम अर्धवट टाकून काढता पाय घेतला. संयोजक डॉ.मीनल खतगांवकर यांनी प्रास्ताविकात जिल्हाध्यक्ष आ.राम पाटील रातोळीकर यांना कुणाला एक कप चहाही न पाजता झालेले आमदार या शब्दात मारलेल्या खोचक टोल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या.

दरम्यान खतगांवकरांनी मोठा गाजावाजा करुन घेतलेल्या या कार्यक्रमाने भाजपच्या अंतर्गत गटबाजीला प्रचंड उधाण आले असून आ.राठोड व आ.चिखलीकर यांच्या गैरहजेरीचे देखील तेच कारण असल्याचे कळते. काहींनी तर आपल्या नेत्याला बोलू न दिल्याचा संताप थेट सोशल मिडियावर व्यक्त केला. एकूणच भाजपातील सध्याची गटबाजी पाहता उपरे कारभारी अन् निष्ठावंत दारोदारी अशी गत झाल्याची भावना दस्तूरखुद्द भाजपा कार्यकर्तेच बोलून दाखवत आहेत.