ACP च्या घरावर ACBची धाड, 75 कोटींचे घबाड सापडले

प्रातिनिधिक फोटो

हैदराबादमधल्या मलकाजगिरी भागातील सहायक पोलीस आयुक्त नरसिम्हा रेड्डी यांच्या घरासह अन्य काही ठिकाणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी छापेमारी केली. यामध्ये पोलिसांना 75 कोटींचे घबाड सापडले आहे. हैदराबाद, तेलंगाणा आणि आंध्र प्रदेशातील इतर भागांमध्ये ही छापेमारी करण्यात आली होती. रेड्डी यांच्या नातेवाईकांच्या घरांवरही पोलिसांनी छापे टाकले होते.

रेड्डी यांनी गैरमार्गाने जमा केलेली संपत्ती हुडकून काढण्यासाठी पोलिसांना 20 ठिकाणी छापेमारी करावी लागली. ज्यात करीमनगर, वारंगल आणि नालगोंडा इथल्या रेड्डी यांच्या नातेवाईकांच्या ठिकाणांचाही समावेश आहे. गुरुवारी म्हणजे आज रेड्डी आणि त्यांच्या कुटुंबियांचे बँकेतील लॉकर उघडण्यात येणार आहे. त्यातून आणखी मोठं घबाड हाती लागण्याची शक्यता आहे. रेड्डी यांनी हैदराबाद शहरातील नाचाराम, हबसीगुडा, गुडीमलकापूर आणि घाटकेसर भागात जमिनी विकत घेतल्याचे पोलिसांना कळाले होते. घाटकेसर भागात रेड्डी यांनी 33 एकर जमीन घेतली होती. याशिवाय त्यांनी अनंतपूर जिल्ह्यातही 55 एकर जमीन घेतली होती असे पोलिसांना कळाले आहे. प्राथमिक तपासात पोलिसांना कळाले आहे की रेड्डी हे जमिनींच्या सौदेबाजीतून पैसा कमवत होते. उप्पल भागात पोलीस निरीक्षक असल्यापासून त्यांनी या दोन नंबर धंद्याला सुरुवात केली होती असंही पोलिसांना कळालं आहे.

रेड्डी यांचे परिचित असलेल्या गंगाधर मंडल एमपीपी आणि श्री रामुला मधुकर यांच्या घरावरही छापेमारी करण्यात आली आहे. बोंथू राममोहन हे हैदराबाद महापालिकेमध्ये महापौर म्हणून विराजमान झाल्यानंतर श्री रामुला मधुकर यांची बायको बोनाला श्वेता यांची हैदराबाद महापालिकेच्या मुख्य माहिती अधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली होती. मधुकर आणि राममोहन यांच्या आर्थिक लागेबांधे असावेत असा पोलिसांना दाट संशय आहे. या दोघांच्या संबंधांमध्येही सहायक पोलीस आयुक्त नरसिंम्हा रेड्डी यांची महत्वाची भूमिका असल्याचा पोलिसांना संशय आहे. याचा तपास करण्यासाठी पोलिसांनी मधुकर यांचा लॅपटॉप आणि मोबाईल जप्त केले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या