
नारायण राणे यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल वृत्तवाहिन्यांशी बोलताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी हल्लाबोल केला. या प्रकरणावर मला काही बोलायचे नाही. मी राणेंना फारसे महत्त्व देत नाही. त्यांच्या पद्धतीने, त्यांच्या संस्काराप्रमाणे ते बोलतात, असे ते म्हणाले.
समर्थन नाही, पण पाठिंबा
मुख्यमंत्री पदाबाबत, त्या पदावर बसलेल्या व्यक्तीबाबत वक्तव्य करताना संयम बाळगणे महत्त्वाचे आहे. राणेंच्या वक्तव्याचे समर्थन भाजप करत नसला तरी व्यक्ती म्हणून नारायण राणे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे. बोलण्याच्या भरात नारायण राणेंनी तसे वक्तव्य केले असावे. त्यांनी वक्तव्य केले असले तरी तसे प्रत्यक्ष वागणे काही त्यांना अभिप्रेत नसावे. नारायण राणेंना अटक झाली तरीही जन आशीर्वाद यात्रा सुरूच राहणार आहे. – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते
काही लोकांचा स्तर घसरलाय
नारायण राणे यांचे वक्तव्य निषेधार्ह आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल असे बोलणे हा महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान आहे. अशी भाषा राजकारणात यापूर्वी कधीही कुणी वापरलेली नाही. राजकारणाचा स्तर खाली गेलाय असं नाही तर काही लोकांचा स्तर खाली गेलाय. नरेंद्र मोदींनी कसे सहकारी निवडले आहेत याची छोटीशी चुणूक नारायण राणे यांच्या वक्तव्यावरून राज्याला व देशाला कळली. – जयंत पाटील प्रदेश अध्यक्ष, राष्ट्रवादी कॉँग्रेस




























































