Madhya Pradesh Election – भाजपच्या बंडखोर नेत्याने स्वत:चा पक्ष काढला, 25 उमेदवार रिंगणात उतरवले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्य प्रदेशात निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून तिकीट न मिळाल्याने नाराज नेत्यांनी पक्ष बदलण्यास सुरुवात केली आहे. भाजप नेते नारायण त्रिपाठी यांनी थोडा वेगळा पवित्रा घेत भाजपला सोडचिठ्ठी देत स्वत:चा पक्ष काढला. त्रिपाठी हे सातत्याने भाजपविरोधी विधाने करणारे नेते म्हणून प्रसिद्ध होते. वेगळे विंध्य राज्य व्हावे अशी त्यांची मागणी असून या मागणीसाठी आपण आपला पक्ष काढल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्रिपाठी हे मैहर मतदारसंघाचे आमदार असून नुकतीच ‘मैहर’ हा जिल्हा म्हणून घोषित करण्यात आला होता. मैहरला जिल्ह्याचा दर्जा दिल्याचे श्रेय त्रिपाठी यांनी काँग्रेसला दिले होते.

त्रिपाठी यांनी आपल्या पक्षाविरुद्ध बंड करून ‘विंध्य जनता पार्टी’ (VJP) नावाचा स्वतःचा पक्ष सुरू करण्याची घोषणा केली आहे. आगामी मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी त्रिपाठी यांनी त्यांच्या नवीन पक्षाच्या 25 उमेदवारांची पहिली यादीही जाहीर केली. पुढील महिन्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत नारायण त्रिपाठी स्वतः मैहर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.

त्रिपाठी यांनी जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीमध्ये 10 अनुसूचित जमाती (ST), एक अनुसूचित जाती (SC) आणि 14 खुल्या वर्गातील उमेदवारांना स्थान दिले आहे. त्रिपाठी यांनी शुक्रवारी राज्याची राजधानी भोपाळमध्ये पत्रकार परिषद आयोजित केली होती. यामध्ये बोलताना ते म्हणाले की, त्यांचा पक्ष यंदाच्या निवडणुकीत एकूण 40 उमेदवार उभे करणार आहे. यातील 25 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली असून लवकरच उर्वरित 15 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येणार आहे. “विकासासाठी विंध्य महत्त्वाचा आहे आणि मी नेहमीच विंध्य राज्याचा मुद्दा उपस्थित केला. आम्ही भाजपमध्ये बोललो तेव्हा त्यांनी आम्हाला बंडखोर ठरवण्यात आले. यामुळेर यापुढची लढाई ही मलाच लढायची आहे.”

त्रिपाठी यांना अगदी शेवटच्या क्षणी पक्षाची नोंदणी करण्यात यश मिळाले. विंध्य भागातील जनतेची फसवणूक झाली असून कोणत्याही सरकारने त्यांच्या हिताचे निर्णय घेतले नसल्याचा आरोप त्यांनी केला. गेल्या 20 वर्षांपासून राज्यात भाजपचे सरकार सत्तेवर असूनही विंध्य प्रदेशासाठी कोणताही निर्णय सरकारने घेतला नसल्याचा दावा त्यांनी केला. “आमच्याकडे भरपूर संसाधने आहेत पण तरीही या परिसरात रोजगार नाही. आम्ही विंध्य प्रदेशच्या उभारणीसाठी पुढे आलो आहोत. आमचे एकमेव उद्दिष्ट विंध्य प्रदेश निर्माण करणे आहे,” असेते पुढे म्हणाले. त्रिपाठी यांनी सातत्याने वेगळ्या ‘विंध्य प्रदेश’ची मागणी केली असून याच कारणामुळे त्यांचे भाजपमध्ये खटके उडाले होते. त्रिपाठी हे काँग्रेस पक्षाच्याही संपर्कात होते आणि त्यांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यात विंध्य प्रदेश निर्मितीचा समावेश करण्याची मागणी केली होती. काँग्रेसने ही मागणी फेटाळल्याने त्रिपाठी यांनी स्वत:च पक्ष उभा करण्याचा निर्णय घेतला. मध्य प्रदेशात 17 नोव्हेंबरला मतदान होणार आहे आणि 3 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. मध्य प्रदेशात विधानसभेच्या एकूण मतदार 230 जागा आहेत.