
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पकडलेल्या ‘बोटा’नंतर आज राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचेही ‘बोट’ धरले! दिल्लीच्या राजकारणात प्रणवदांचे बोट पकडून स्वतःला सेट करण्याचे भाग्य मला मिळाले, असे मोदी यांनी सांगितले.
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यावरील ‘प्रेसिडेण्ट अ स्टेटस्मॅन’ या चित्रचरित्राचे प्रकाशन राष्ट्रपती भवनात झाले. त्यानिमित्त मुखर्जी आणि पंतप्रधान मोदी व्यासपीठावर एकत्र आल्यानंतर मोदी बोलत होते.
मुखर्जी यांच्यासारख्या अनुभवी व्यक्तिमत्त्वासोबत काम करता आले, हे माझे भाग्यच आहे असे सांगत पंतप्रधानांनी मुखर्जी यांच्यावर स्तुतिसुमने उधळली.
गेल्या तीन वर्षांत राष्ट्रपती मुखर्जी यांच्याशी माझी झालेली एकसुद्धा भेट अशी नव्हती की, ज्यावेळी त्यांनी पित्यासारखी माझी काळजी वाहिली नाही. मला सल्ला-मार्गदर्शन केले नाही, असे सांगून मोदी म्हणाले, उत्तर प्रदेशातील निवडणुकीची धावपळ होती. पण प्रणवदा मला नेहमीच विश्रांतीचा सल्ला द्यायचे. इतकी धावपळ का करताय? तब्येतीला आधी जपा, काही कार्यक्रम कमी करा, असे सांगायचे.


























































