
गुजरातमध्ये गोध्रा जळीतकांडानंतर 2002 मध्ये उसळलेल्या दंगलीत नरोडा गाम येथे भयंकर हत्याकांड घडले. 11 जणांना जिवंत जाळले. या प्रकरणातील प्रमुख आरोपी भाजप नेत्या, माजी मंत्री माया कोडनानी, बजरंग दलाचे माजी नेते बाबू बजरंगी, विहिंपचे जयदीप पटेल यांच्यासह 68 आरोपींची आज विशेष न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. दंगलीनंतर 21 वर्षांनी हा निकाल लागला आहे. दरम्यान, बिल्किस बानो प्रकरणी आरोपींना सोडल्यामुळे देशभरात गदारोळ झाला. सर्वोच्च न्यायालयाने याची गंभीर दखल घेतली असतानाच आता पुन्हा नरोडा प्रकरणाचा निकाल धक्कादायक मानला जातोय.
2002 मध्ये नरोडा गाम येथे जातीय दंगल उसळली आणि 11 जणांचे हत्याकांड झाले. गुजरात दंगलीची चौकशी करणाऱया नानावटी आयोगाच्या अहवालानंतर आठ वर्षांनी 2010 मध्ये खटला दाखल झाला. जलद सुनावणीसाठी अहमदाबादेत विशेष न्यायालय स्थापन केली. परंतु 13 वर्षांनी खटला सुरू झाला. विशेष न्यायालयाच्या न्यायाधीश शुभदा बक्षी यांच्यासमोर सुनावणी झाली. खटल्यात 86 आरोपी होते. मात्र, 17 आरोपींचे सुनावणीदरम्यान निधन झाल्यामुळे उर्वरित 68 आरोपी विरोधात खटला चालला. हे सर्व आरोपी जामिनावर बाहेर होते. 5 एप्रिल रोजी न्यायाधीश शुभदा बक्षी यांनी निकाल राखून ठेवला होता. आज न्यायाधीश बक्षी यांनी सर्व 68 आरोपींची निर्दोष मुक्तता केली.
- माया कोडनानी यांच्या बाजूंनी ज्यांची साक्ष झाली त्यात पेंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा समावेश होता. 18 सप्टेंबर 2017 ला शहा यांनी न्यायालयात साक्ष दिली. तेव्हा ते भाजपचे अध्यक्ष होते.
2002 मध्ये काय घडले होते?
- गोध्रा रेल्वे स्टेशन येथे 27 फेब्रुवारी 2002 ला साबरमती एक्सप्रेसचे डबे पेटविण्यात आले. या जळीतकांडानंतर गुजरातमध्ये दंगल उसळली. नऊ ठिकाणी मोठा जातीय हिंसाचार होऊन हत्याकांड घडले.
- 28 फेब्रुवारी 2002 ला नरोडा गाम येथे दंगलीत जमावाने घरांना आगी लावल्या. त्यात 11 जणांचा मृत्यू झाला. भाजप नेत्या माया कोडनानी या नरोडाच्या आमदार होत्या. तत्कालीन मोदी सरकारमध्ये त्या मंत्री होत्या. दंगल भडकविण्यात, हत्याकांडात त्यांना प्रमुख आरोपी म्हणून खटला चालवला.
- नरोडा गामच्या वेळीच नरोडा पटिया भागातही भयंकर दंगल उसळली. तब्बल 10 तास जाळपोळ सुरू होती. यात 97 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये 36 महिला आणि 35 लहान मुले होती. नरोडा पटिया प्रकरणातही माया कोडनानी, बाबू बजरंगीसह 70 आरोपी होते. 2012 मध्ये विशेष न्यायालयाने 32 आरोपींना शिक्षा सुनावली होती. कोडनानी यांना 28 वर्षे तुरुंगवासाची शिक्षा ठोठाविली. मात्र, उच्च न्यायालयाने 2018 ला त्यांची मुक्तता केली. आता नरोडा गाम दंगलप्रकरणीही कोडनानींसह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे.




























































