नाशिक जिल्ह्यात पाच दिवस पुरेल इतकाच लस साठा

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिह्यात सध्या 224 केंद्रांवर लसीकरण सुरू आहे. किमान चार ते पाच दिवस पुरेल इतका साठा सध्या उपलब्ध आहे.

कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणाचा सध्या तिसरा टप्पा सुरू आहे. जिह्यात शासकीय, खासगी रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र अशा 224 ठिकाणी लसीकरणाची व्यवस्था आहे. जिह्यात दिवसाला साधारण 14 हजार ते 18 हजार डोसची आवश्यकता भासते. नाशिक, मालेगाव महापालिका क्षेत्र आणि जिह्याच्या ग्रामीण भागात एकूण 1 लाख 20 हजार डोस उपलब्ध आहेत. हा साठा किमान चार ते पाच दिवस पुरेल इतका आहे. आठवडाभरासाठी आणखी एक लाख डोसची मागणी करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे अधिकारी डॉ. राजेंद्र चौधरी यांनी दिली.

आतापर्यंत 3 लाख 73 हजार नागरिकांचे लसीकरण

जिह्यात आतापर्यंत आरोग्य व इतर कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक, 45 वर्षावरील कोमॉर्बिड रुग्ण अशा 3 लाख 34 हजार 391 जणांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. 39 हजार 288 आरोग्य व इतर कर्मचाऱयांनी दुसरा डोस घेतल्याने आतापर्यंत एकूण 3 लाख 73 हजार नागरिकांचे लसीकरण झाले आहे.

रेमडेसिवीर अग्रक्रमाने – जिल्हाधिकारी

दोन दिवसांपासून मेडिकलमध्ये रेमडेसिवीर खरेदीसाठी मोठय़ा संख्येने कोरोनाबाधित रुग्णांच्या नातेवाईकांची गर्दी होत आहे, बुधवारी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी तेथे भेटी देत संवाद साधला. रुग्णालयात प्रत्यक्ष उपचार घेत असलेल्या रुग्णांना अग्रक्रमाने रेमडेसिवीर उपलब्ध होईल. रुग्णालयाने आपल्याकडील रेमडेसिवीरचा साठा संपल्यानंतर संबंधीत रुग्णासाठी शिफारसपत्र दिल्यानंतर या औषधाचे वितरण करावे, असे आदेश त्यांनी अन्न व औषध प्रशासनाच्या सहआयुक्तांना दिले आहेत.

शहरात दिवसाला सहा हजार डोस

नाशिक महापालिका क्षेत्रात खासगी 24 आणि सरकारी 27 लसीकरण केंद्र आहेत. शहराला दिवसाला साडेपाच हजार ते सहा हजार डोस लागतात. महापालिकेकडे सध्या कोविशिल्ड- 15 हजार 250, तर कोव्हॅक्सिन- 4 हजार 500 असा एकूण 19 हजार 750 लसींचा साठा आहे. 13 जानेवारी ते 7 एप्रिलदरम्यान शहराला 2 लाख 9 हजार 110 डोस मिळाले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या