नाशिकच्या लष्करी जवानाचा श्रीनगरमध्ये मृत्यू

793

नाशिकच्या आडगाव येथील आप्पा मधुकर मते या लष्करी जवानाचा जम्मू-कश्मीरमध्ये श्रीनगरजवळ कर्तव्य बजावत असताना मंगळवारी रात्री ऑक्सिजनच्या कमतरतेने मृत्यू झाला. यामुळे आडगाव व परिसरावर शोककळा पसरली आहे. त्यांचे पार्थिव गुरुवारी सायंकाळपर्यंत नाशिकला आणण्यात येणार असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली.

आडगाव येथील आप्पा मधुकर मते (34) हे सन 2004 पासून सीमा सुरक्षा दलात हेड कॉन्स्टेबल पदावर कार्यरत आहेत. सध्या ते श्रीनगरजवळ उंच भागातील चौकीवर  तैनात होते. या भागात मंगळवारी रात्री बर्फवृष्टी सुरू होती. यावेळी जेवण करताना ते अचानक बेशुद्ध झाले. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे त्यांचा मृत्यू झाला असावा, असे त्यांचे नातेवाईक साहेबराव गंगाधर नवले यांनी सांगितले.

आप्पा मते यांच्या पश्चात आई म्हाळसाबाई (60), पत्नी मनीषा (30), मुलगा प्रतिक (11) आणि भाऊ भगीरथ असा परिवार आहे. श्रीनगर येथून आप्पा मते यांचे पार्थिव गुरुवारी सायंकाळपर्यंत नाशिकला आणण्यात येईल, अशी माहिती नवले यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या