
‘राष्ट्रीय पुरस्कार’ विजेते दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांचा ‘टीडीएम’ हा सिनेमा गेल्याच आठवडय़ात प्रदर्शित झाला आहे; परंतु या सिनेमाला शो मिळत नसल्याने कलाकारांना अश्रू अनावर झाले आहे. मराठी सिनेमा संपवला जात आहे. आता यापुढे सिनेमा करण्याची माझी इच्छा नाही, अशी खंत या दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांनी व्यक्त केली आहे.
भाऊराव कऱ्हाडे म्हणाले, ‘टीडीएम’ हा सिनेमा प्रेक्षकांना आवडतोय आणि प्रेक्षक हा सिनेमा पाहण्याची इच्छा व्यक्त करत आहेत. मात्र, सिनेमागृहात शो नसल्याकारणाने मराठी प्रेक्षकांवर आणि कलाकारांवर अन्याय होत आहे. मराठी सिनेमा संपवला जात आहे. आता यापुढे सिनेमा करण्याची माझी वैयक्तिक इच्छा नाही’, असे म्हणताना भाऊराव यांना अश्रू अनावर झाले.
पुढे ते म्हणाले, आमच्या सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असताना शो रद्द करणे कितपत योग्य आहे? पिंपरी चिंचवडमध्ये या सिनेमाचे दोन शो होते. सिनेमागृह तुडुंब भरलेले असतानाही शो वाढवून दिला नाही. त्यामुळे मी त्या थिएटर मालकांकडे विचारपूस केली. त्यांनी मला सांगितले की, या सिनेमाचा एकच शो लावण्याचे ‘वरून’ प्रेशर आहे. माझ्या सिनेमाला मिळालेले शो ऑड टाइममधील आहेत.
स्क्रीन न मिळणे दुर्दैवी –अजित पवार
या प्रकरणावर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ट्विट करत राष्ट्रीय पुरस्कार विजेते, चित्रपट दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांच्या टीडीएम या चित्रपटाला थिएटरमध्ये स्क्रीन न मिळणे अत्यंत दुर्दैवी आहे, असे म्हटले आहे. तसेच संबंधितांनी या चित्रपटाला प्राईम टाईम स्लॉटमध्ये लवकरात लवकर स्क्रिन उपलब्ध करून द्यावी, अशा सूचनादेखील त्यांनी केल्या आहेत.





























































