राष्ट्रीय बॉक्सिंग शिबिराला कोरोनाचा फटका, खेळाडू व सपोर्ट स्टाफला लागण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पटियाळा येथे सुरू असलेल्या हिंदुस्थानी बॉक्सिंग संघाच्या राष्ट्रीय शिबिराला कोरोनाचा फटका बसताना दिसत आहे. पुरुषांच्या संघाचे प्रशिक्षक जयसिंग पाटील यांना कोरोनाची लागण झाल्याचे सोमवारी समजले. आता या शिबिरातील खेळाडू व सपोर्ट स्टाफ मिळून 13 जण कोरोनाबाधित झाले आहेत. काहींना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून काही विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.

याआधी दीपक कुमार (52 किलो वजनी गट), मोहम्मद खान (57 किलो वजनी गट), मनजित सिंग (91 पेक्षा जास्त किलो वजनी गट), नरेंद्र कुमार (91 पेक्षा जास्त किलो वजनी गट) यांना कोरोनाची लागण झाली होती. तसेच जयसिंग पाटील यांच्यासह पुरुषांच्या संघाचे मुख्य प्रशिक्षक सी. ए. कुट्टप्पा यांनाही कोरोना झाल्याचे समोर आले आहे. स्पोर्टस् ऑथोरिटी ऑफ इंडियाकडून या सर्वांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे.

आता कडक निर्बंध

पटियाळा येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय शिबिरात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यामुळे आता येथे कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. एकमेकांसोबत शारीरिक संपर्क येत नसलेला सराव प्रशिक्षकांच्या मार्फत घेतला जात आहे. तसेच संघ सहकाऱयासोबत बैठकीवरही बंधने लादण्यात आली आहेत. तसेच सीनियर राष्ट्रीय स्पर्धेसाठीची निवड प्रकियाही तूर्त थांबविण्यात आली आहे.