मुंबई-पुण्याला जोडणारा तिसरा महामार्ग बांधणार; ‘एनएचएआय’कडून 30 किमीचा आराखडा तयार; लवकरच काम सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई आणि पुणेदरम्यानच्या वेगवान प्रवासासाठी नजीकच्या काळात आणखी एक महामार्ग प्रवासी सेवेत दाखल होणार आहे. दोन शहरांतील प्रवास सुकर करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) आता तिसरा मुंबई–पुणे द्रुतगती महामार्ग बांधण्याचा निर्णय घेतला आहे. एकूण 130 किमीच्या महामार्गापैकी 30 किमीच्या महामार्गाचा आराखडा तयार झाला असून लवकरच काम सुरू केले जाणार आहे. या नव्या महामार्गामुळे मुंबई–पुणेचा प्रवास अवघ्या 90 मिनिटांत शक्य होणार आहे.

मुंबई आणि पुणे या दोन शहरांची कनेक्टिव्हिटी सुधारण्याकडे सरकारने लक्ष दिले आहे. त्यानुसार मिसिंग लिंकपाठोपाठ तिसऱ्या मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाच्या कामाला प्राधान्य देण्यात येणार आहे. हा तिसरा महामार्ग अटल सेतू-चौक-पुणे, शिवारे असा हा 130 किमी अंतराचा असणार आहे. अंदाजे 15 हजार कोटींचा खर्च असलेल्या महामार्गाचा सविस्तर प्रकल्प आराखडा व व्यवहार्यता अभ्यास करण्यासाठी अलीकडेच निविदा मागविल्या आहेत. सध्या अंदाजे 94 किमीचा मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आणि जुना मुंबई-पुणे महामार्ग प्रवासीसेवेत आहे. द्रुतगती महामार्गामुळे मुंबई-पुणे अंतर अडीच तासांत कापता येत आहे. भविष्यातील वाढीव बंदरे, नवी मुंबई विमानतळ आणि तिसऱ्या मुंबईमुळे मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्या गाडय़ांची संख्या मोठय़ा प्रमाणावर वाढणार आहे. त्याचाच विचार करुन एनएचएआयने तिसरा द्रुतगती महामार्ग उभारणीला प्राधान्य दिले आहे.

एनएचएआयकडून पुणे-बंगळुरू महामार्गाचे बांधकाम सुरू आहे. त्याचा विस्तार तिसऱ्या मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाद्वारे करण्यात येणार आहे. अटल सेतू संपतो त्या ठिकाणापासून हा महामार्ग सुरू होणार आहे. महामार्गातील 30 किमीच्या आराखडय़ाचे काम पूर्ण झाले असून कंत्राटदाराच्या नियुक्तीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. सविस्तर प्रकल्प आराखडा आणि व्यवहार्यता तपासण्यासाठी सल्लागार नेमण्यात येणार आहे. त्यासाठी निविदा मागविल्या असून 24 जूनपर्यंत इच्छुक कंपन्यांना निविदा सादर करता येणार आहे.