धडधडीत खोटे बोलणाऱ्या भाजपलार गणिताचे धडे द्यायला हवेत, राष्ट्रवादी काँग्रेसची टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शरद पवार यांनी केंद्रात कृषिमंत्रीपदी राहूनही शेतकऱयांसाठी काहीच केले नाही अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. त्यावरुन सध्या भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान भाजपने त्यांच्या कार्यकाळात शेतकऱ्यांच्या शेतमालाला दुप्पट हमीभाव दिल्याचा दावा केला. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला फटकारले आहे.

भाजपने शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसीनुसार शेतकऱ्यांच्या शेतमालाला दुप्पट हमीभाव देण्याचे काम मोदी सरकारच्या कार्यकाळात झाले असे म्हटले आहे. तसेच शेतमालाला दुप्पट भाव दिल्याची आकडेवारीही शेअर केली आहे. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपवर टीका केली आहे.

”स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसीनुसार शेतकऱ्यांच्या शेतमालाला दुप्पट हमीभाव देण्याचे काम मोदी सरकारच्या कार्यकाळात झाले, असं धडधडीत खोटे बोलणाऱ्या पक्षाला पहिले तर गणिताचे धडे द्यायला हवेत. पक्ष कार्यालयात गणिताचे पुस्तक धाडून देतो आम्ही. शेतकऱ्यांच्या शेतमालाला 2022 साली मिळालेला MSP👇 नक्की दुप्पट आहे का? हे तुम्हीच ठरवा. तांदूळ: 2014 – 1310 रुपये, दुप्पट – सुमारे 2620 रुपये (मोदी सरकारने दिलेला हमीभाव 2040 रुपये), गहू : 2014- 1400 रूपये – दुप्पट – 2800 रुपये (मोदी सरकारने दिलेला हमीभाव 2015 रुपये) सोयाबीन: 2014- 2560 रुपये – दुप्पट – सुमारे 5120 रुपये (मोदी सरकारने दिलेला हमीभाव 4300 रुपये) हमीभाव ‘दुप्पट’ करणे काही तुम्हाला जमले नाही, मात्र वेळोवेळी ‘दुटप्पी’ भूमिका घेऊन शेतकऱ्यांची फसवणूक करून त्यांचे नुकसान करणे थांबवा”, अशी टीका राष्ट्रवादीने केली आहे.