
‘मराठी नाटक समूह’ आणि ‘अभिषेक थिएटर्स’च्या संयुक्त विद्यमाने आणि ‘अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदे’च्या सहकार्याने ‘नाट्य निरंतर’ नावाचा अभिनव उपक्रम सुरू झाला आहे. दर महिन्यात नवीन संकल्पना घेऊन प्रत्येक भाग सादर करण्याचा समूहाचा प्रयत्न असणार आहे. “संकल्पना ते सादरीकरण : एक निरंतर प्रक्रिया’’ नामक या उपक्रमाचा शुभारंभ 27 फेब्रुवारी रोजी यशवंत नाट्य संकुलाच्या ‘साळगांवकर प्रायोगिक रंगमंच’ या ठिकाणी झाला. त्यावेळी दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी या उपक्रमाची भूमिका विशद केली.
आतापर्यंत मानसी मराठे, सुयश झुंजुरके, सुशील इनामदार, अभिराम भडकमकर, जयश्री जगताप, रोहिणी हट्टंगडी, चंद्रकांत कुलकर्णी आणि कौशल इनामदार आदी मान्यवरांनी या व्यासपीठावर सादरीकरण केले आहे. आजवर तीन भाग सादर झाले असून त्याचा पुढील भाग शुक्रवार, 29 मे रोजी संध्याकाळी 6.30 वाजता सादर होणार आहे.
‘नाटक आमच्या नजरेतून’ या शीर्षकाखाली नाट्यक्षेत्रातील लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते आपले विचार मांडणार आहेत. अमोल परचुरे या नामवंतांशी संवाद साधतील. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य असून या तसेच पुढच्या सगळ्या कार्यक्रमांचा रंगकर्मींनी आणि रसिक प्रेक्षकांनी फायदा करून घ्यावा, असे आवाहन प्रशांत दामले यांनी केले आहे. पहिल्या तीन भागांना रसिकांनी उदंड प्रतिसाद दिल्यामुळे मराठी नाटक समूहाला उत्साह आला आहे आणि त्याचबरोबर प्रतिमहिना विविध कल्पना घेऊन भाग सादर करण्याची जबाबदारीदेखील आलेली आहे. रसिकांच्या आशीर्वादाने आणि नामवंतांच्या सहकार्याने हा उपक्रम नक्कीच यशस्वी होईल, असा विश्वास आशीर्वाद मराठे यांनी व्यक्त केला.




























































