
सामना ऑनलाईन । मुंबई
दिवंगत माजी मुख्यमंत्री ए. आर. अंतुले यांचे पुत्र नावेद अंतुले यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘मातोश्री’ निवासस्थानी शिवबंधन बांधून तसेच हाती भगवा देत त्यांचे शिवसेनेत स्वागत केले.
लोकसभा निवडणुकीत रायगड जिह्यात शिवसेनेसोबत काम करण्याची इच्छा नावेद अंतुले यांनी व्यक्त केली होती. यासंदर्भात याआधी उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर नावेद यांनी शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, माननीय शिवसेनाप्रमुख आणि अंतुले साहेब यांचे ऋणानुबंध होते तशीच एक वेगळी मैत्री होती. अर्थात, ही मैत्री एक पक्ष म्हणून राजकारणात एकत्र येऊ शकली नव्हती. आता आम्ही पुढची पिढी ही मैत्री आणि ऋणानुबंध अधिक दृढ करीत आहोत. नावेद यांनी शिवसेनेत परिवाराप्रमाणे राहावे. एक कडवट शिवसैनिक म्हणून काम करावे, अशा शुभेच्छाही उद्धव ठाकरे यांनी दिल्या. शिवसंग्राम पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष उदय आमोणकर यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी शिवसेना नेते-उद्योगमंत्री सुभाष देसाई, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांच्यासह नावेद यांच्यासोबत आलेले कार्यकर्ते तसेच शिवसैनिक उपस्थित होते.
सच्चा शिवसैनिक म्हणून काम करणार – नावेद अंतुले
शिवसेनेत आपण प्रवेश केला आहे तो एक सच्चा शिवसैनिक म्हणून काम करण्यासाठीच. त्यामुळे या लोकसभा निवडणुकीत रायगडमधील शिवसेनेच्या विरोधात निवडणूक लढणाऱ्यांना त्यांची जागा कळून चुकेल, अशी प्रतिक्रिया नावेद अंतुले यांनी दिली.


























































