
नवी मुंबईत फ्लेमिंगोंचा अधिवास असलेल्या एनआरआय, टी. एस. चाणक्य तलावाजवळ आणि एरोली खाडीकिनारी फटाके फोडण्यास, ड्रोन उडवण्यास, बँड वाजवण्यास वनविभागाने बंदी घातली आहे. अनेक पक्षीप्रेमी या ठिकाणी फ्लेमिंगोंचे शूटिंग करण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्याचा वापर करत होते. याबाबत तक्रारी आल्यानंतर वनविभागाने हा निर्णय घेतला आहे. फ्लेमिंगोंचा अधिवास असलेल्या तलावांत नागरिकांनी पोहण्यास जाऊ नये, अन्यथा कडक कारवाई करण्याचा इशाराही वनविभागाने दिला आहे.
नवी मुंबईत यंदा मोठ्या संख्येने फ्लेमिंगो आले आहेत. या पक्ष्यांना पाहण्यासाठी दररोज हजारो पक्षीप्रेमी नवी मुंबईत येऊन या पक्ष्यांचे निरीक्षण करतात. काही अतिउत्साही पक्षीप्रेमी या फ्लेमिंगोजवळ ड्रोन कॅमेरा नेऊन त्यांचे शूटिंग करत आहेत. हे या पक्ष्यांसाठी धोकादायक असल्याने काही सामाजिक संस्थांनी वनविभागाकडे तक्रार केली. त्यानुसार वनविभागाने एक नियमावली जाहीर केली आहे.
ज्या तलावात फ्लेमिंगो आहेत
- त्या तलावात नागरिकांनी प्रवेश करू नये.
- फ्लेमिंगोपासून सुरक्षित अंतर ठेवावे.
- अशी सूचना वनविभागाने केली आहे.
- फ्लेमिंगो पक्ष्यांची शिकार करणे, तलावाच्या परिसरात आग लावणे आणि कचरा जाळण्यास मनाई करण्यात आली आहे.
- फ्लेमिंगोंच्या तलावात निर्माल्य टाकण्यासही बंदी घालण्यात आली आहे.


























































