नवज्योतसिंग सिद्धूला उपमुख्यमंत्रीपद मिळणार; राजकीय चर्चांना उधाण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

माजी क्रिकेटपटू आणि राजकीय नेते नवज्योतसिंग सिद्धू यांचे मंत्रिमंडळात दमदार पदार्पण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सिद्धू यांना उपमुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता राजकीय वर्तुळात सुरू आहे.  सिद्धू यांना उपमुख्यमंत्रीपद देण्यात यावे, असे काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांचे मत आहे. याबाबत त्यांनी पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्याशी चर्चा केली आहे. काही महिन्यांपासून नाराज असलेल्या सिद्धू यांची नाराजी दूर करण्यासाठी हा निर्णय घेण्यात येऊ शकतो. तसेच आप आणि भाजपकडून सिद्धू यांना आपल्या पक्षात वळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे सिद्धू यांना परत मंत्रिमंडळात घेण्याबाबत काँग्रेसचे पक्षश्रेष्ठी विचार करत आहेत.

अमरिंदर सरकारवर पक्षातीलच अनेक आमदार नाराज आहेत. त्या आमदारांचे नेतृत्व सिद्धू करत असल्याची चर्चा आहे. त्यासाठी त्यांना मंत्रिमंडळात स्थान देत त्यांना उपमुख्यमंत्रीपद देण्याबाबतच्या राजकीय चर्चांना उधाण आले आहे. याबाबत काँग्रेसने या वृत्ताला नकार दिलेला नाही. तसेच सावध प्रतिक्रिया देताना पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील, तो सर्वांना मान्य असेल असे म्हटले आहे. सिद्धू यांच्या मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता असतानाच अमरिंदर सिंग यांचे राजकीय सल्लागार आणि आमदार अमरिंदर सिंग राजा वडिंग यांनी काही मंत्र्यांचे नाव न घेता त्यांना इशारा दिला आहे.  काही मंत्री योग्य काम करत नाही. कार्यक्षमता नसलेल्या मंत्र्यांना पदावरून हटवण्यात येईल, असे ते म्हणाले आहेत. त्यांच्या या वक्तव्याने नवा वाद उभा राहिला आहे. तसेच पक्षातील नाराजी उळाफून येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सिद्धू यांनी पदाच्या मोहात अडकू नये, कोणत्या कारणामुळे त्यांना पदावरून हटवण्यात आले, याचा विचार करत त्यांनी आपल्या भूमिकेवर ठाम राहवे, असे मत आपचे आमदार कुलतारसिंग संधवा यांनी व्यक्त केले आहे. ही काँग्रेस पक्षातील अंतर्गत बाब आहे, असे सांगत भाजपने याबाबत प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. सिद्धू भाजप, आप किंवा इतर कोणत्या पक्षात जाणार याचे उत्तर सिद्धूच देऊ शकतात, असेही भाजपने स्पष्ट केले आहे. सिद्धू यांनी 20 जुलैला मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. मात्र, त्याबाबत पंजाब सरकारने कोणतेही निर्देश दिले नसल्याने सिद्धू यांना अजूनही मंत्र्यांचे वेतन आणि भत्ते मिळत आहेत. विधानसभेच्या नोंदीनुसार सिद्धू अजूनही कॅबिनेट मंत्री आहेत.