घटस्थापनेपासून नवरात्र महोत्सवास सुरवात झाली आहे. या निमित्त दुपारी दरवर्षी प्रथा परंपरेप्रमाणे दुसऱ्या दिवशी श्री विठ्ठल व माता रुक्मिणीला पारंपारिक पोषाखासह अलंकार परिधान करण्यात आले आहेत. त्यामध्ये रूक्मिणी मातेस लमाणी पोषाख परिधान करण्यात आला असल्याची माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली
रुक्मीणी मातेस चिंचपेटी, तनमई मोठा, भोर, झेला, ठुशी, लहान सरी, सोन्या मोत्याचा तोरड्याजोड, मोत्याचा मोठा कंठा, बाजीराव गरसोळी, मन्या मोत्याची पातळजोड, मोत्याचे मंगळसूत्र, रूळ जोड, पैंजण जोड, लमाणी नथ, कर्णफुले जोड, पुतळ्याच्या माळा, तारा मंडळ इत्यादी प्रकारचे अलंकार परिधान करण्यात आलेले आहेत. तसेच श्री विठ्ठलास देखील नेहमी प्रमाणे सोने मुकुट, कौस्तुक मणी, मोत्याचा चुरा, दंड पेल्याचा मोठा जोड, हि-यांचा कंगण जोड, एक पदरी मोत्याची कंठी, लहान-मोठा शिरपेच, मत्सजोड, हायकोल, पुतळ्यांची व मोहरांची माळ, एकदाणी, तोडेजोड, तीन पदरी तुळशी माळ इत्यादी पारंपरिक अलंकार परिधान करण्यात आले आहेत. तसेच सत्यभामादेवीला नक्षीटोप, जप्याच्या माळा, जवेच्या माळा, जवमणी पदक, पुतळ्याची माळ तसेक राधिकामातेला सिध्देश्वर टोप, हायकोल, चिंचपेटी तांबडी, मोहरांची माळ, जव्याची माळ परिधान करण्यात आली. तसेच मंदिर समितीच्या अख्त्यातरीत असलेल्या पंढरपूर शहर व परिसरातील लखुबाई, अंबाबाई, पद्मावती, यल्लमादेवी, यमाई-तुकाई माता आदी परिवार देवतांना देखील पारंपारिक पोषाख करण्यात आला आहे.
प्रतिवर्षीप्रमाणे रूक्मिणी मातेस पारंपरिक पोषाखासह अलंकार परिधान करण्यात आले आहेत. सदरचे अलंकार पाहण्यासाठी व दर्शन घेण्यासाठी महिला भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. तसेच सभामंडपातील पारंपारिक कार्यक्रमा शिवाय महिला भजनी मंडळाच्या भजन सेवेने मंदिरात भक्तीमय वातावरण झालेले आहे. नवरात्र उत्सवातील भाविकांची होणारी गर्दी विचारात घेऊन श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर व परिवार देवता मंदिरात पुरेसा प्रमाणात सोई सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले.