
कुलाबा येथील नौदल तळावर एका 24 वर्षीय नौसैनिकाने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. सुट्टीवरुन कामावर परतलेल्या या नौसेनिकाने आत्महत्या का केली याबाबत नेमके कारण समजू शकलेले नाही. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. मात्र मागील वर्षभरातील ही तिसरी आत्महत्या असल्याचे कळते.
रमेश चौधरी असे त्या मृत तरुणाचे नाव असून तो जोधपूरचा रहिवासी आहे. तो अविवाहित असून सुट्टीवरून कामावर परतला होता. त्याच्या घरी आई-वडिल, लहान बहीण असा परिवार आहे. मुंबई कुलाबा येथे ‘आयएनएस बेतवा’ वर तो तैनात होता. रविवारी सकाळी त्याने आपल्या सर्व्हिस रायफलने स्वत:वर गोळी झाडली. जहाजावर त्याचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता आणि त्याच्याशेजारी रायफल ठेवलेली होती. त्यावरुन त्याने आत्महत्या केल्याचा अंदाज लावण्यात आला.
सुट्टीवर घरी गेल्यावर जमिनीच्या वादांमुळे ते तणावात असल्याचे अहवालात समोर आले होते. मागच्या वर्षात झालेल्या दोन आत्महत्येच्या घटनांमध्ये कुलाबा नौदल तळावरील दोघे सैनिक सुट्टीवरूनच परतले होते व तिघेही पंचवीशीच्या आतील होते. त्यामुळे याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
हिंदुस्थानच्या भूदलात आत्महत्येची प्रकरणे समोर येतात पण नौसेनेत अशी प्रकरण फार कमी दिसून आली आहेत. जवानांना अनेकदा मानसिक ताणतणावाचा सामना करावा लागतो. त्या तणावातून आत्महत्या केल्याचे समोर येते. याआधी गेल्यावर्षी 2020 जानेवारी मध्ये एका नाविकाने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. आयएनएस शिवालिक वर तैनात असलेल्या 24 वर्षीय नाविकाने स्वत:च्या पिस्तुलाने गोळी मारली होती.

























































