
एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे मुस्लीम असल्याचा दावा करणारी माहिती मुंबई उच्च न्यायालयात सादर करण्यात आल्याचे वृत्त विविध वृत्तवाहिन्यांनी दाखवले. या दाव्याच्या पुष्ठय़र्थ वानखेडे यांचा जन्म दाखला व शाळेचा दाखला जोडल्याचे समजते.
एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक आरोप करत आहेत. त्यामुळे आपल्या कुटुंबाची नाचक्की होत असल्याचा आरोप करत समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात मलिक यांच्या विरोधात सक्वा कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल केला. यावरील सुनावणी पूर्ण झाली असून निकाल राखून ठेवला आहे.
या प्रकरणी आज मुंबई उच्च न्यायालयात पालिकेने वानखेडे यांचा जन्म दाखला सादर केल्याचे वृत्त काही वृत्तवाहिन्यांनी दिले. मात्र या वृत्ताला अधिकृत दुजोरा मिळाला नाही.
न्यायालयात आज सुनावणी
या प्रकरणी वानखेडे यांच्या विरोधात आणखी काही कागदपत्रे सादर करण्याची परवानगी न्यायालयाने द्यावी यासाठी नवाब मलिक यांनी अर्ज केला आहे. यावर उद्या गुरुवारी न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या दालनात दुपारी सुनावणी होणार आहे.




























































