महाविकास आघाडी कालही होती, आजही आहे, उद्याही राहील; राजीनाम्याचा विषय आता संपला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘कार्यकर्ते, पक्षातील नेते आणि सर्वांच्या विनंतीला मान देऊन शरद पवार यांनी राजीनाम्याचा निर्णय मागे घेतला. राजीनाम्याचा विषय आता संपला असून, आता आम्ही पुन्हा कामाला लागलो आहोत. महाविकास आघाडीला कुठलाही धक्का लागणार नाही. आम्ही एकत्र होतो आणि एकत्र आहोत,’ अशी ग्वाही विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी बारामती येथे विविध विकासकामांचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना ही ग्वाही दिली.

रत्नागिरीतील सभेत ठाकरे यांनी अजित पवार यांची मिमिक्री केली होती. ‘राज ठाकरे यांना ‘मिमिक्री’शिवाय दुसरे काय जमते?’ असा सवाल त्यांनी केला. ‘मिमिक्री’ करणे हा राज ठाकरे यांचा जन्मसिद्ध हक्क आहे; परंतु जनतेने त्यांना नाकारले असल्याची टीका अजित पवार यांनी केली. पक्ष स्थापनेनंतर त्यांना सुरुवातीला राज्यात 14 आमदार मिळाले. दुसऱया वेळेला जुन्नरला आमचाच सहकारी शरद सोनवणे याने त्यांचे तिकीट घेतल्याने त्यांची पाटी लागली. आता कल्याणचे सहकारी निवडून आले आहेत. त्यांच्याबरोबर पक्षस्थापनेवेळी जे लोक होते त्यातील काही लोक सोडले तर बहुतांश दूर गेलेले आहेत. त्यांना पक्ष वाढविण्याऐवजी अजित पवार यांची ‘मिमिक्री’ करणे, माझे व्यंगचित्र काढणे, यात समाधान वाटत असेल तर शुभेच्छा,’ अशा शब्दांत पवार यांनी ठाकरे यांच्यावर टीका केली.

राज्यातील सत्तासंघर्षासंबंधीच्या प्रश्नावर ते म्हणाले की, ‘शनिवारी बारामतीत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी यासंबंधी सांगितले आहे. एकदा त्यांनी मत व्यक्त केल्यानंतर त्यावर आम्ही प्रतिक्रिया देत नाही. ती आमच्या पक्षाची भूमिका असते.’

पवार यांच्या राजीनाम्याचा विषय आता संपला असून त्यावर चर्चा करण्याचे काही कारण नसल्याचे अजित पवार म्हणाले. महाविकास आघाडी कायम राहणार असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी यावेळी केला.

प्रेम करणारे संभ्रम निर्माण करतात
माझ्यावर मनापासून प्रेम करणारे, माझे काम ज्यांना बघवत नाही असे जे काही लोक आहेत ते माझ्याबद्दल संभ्रमाचे वातावरण निर्माण करीत असल्याचा आरोप अजित पवार यांनी यावेळी केला.