
कुणाला खबर न लागू न देता भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचा पाठिंबा मिळवला आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप घडवून आणला. मात्र शनिवारी म्हणजे तीन दिवसांपूर्वी पहाटेच्यावेळी बनलेले हे सरकार 80 तासांमध्ये गडगडलं. अजित पवारांनी पुन्हा एकदा राजीनामा देऊन भाजपला दुसरा हादरा दिला. मात्र त्यांच्या राजीनाम्याची माहिती अधिकृतरित्या देवेंद्र फडणवीस यांनी दिली आणि त्यानंतर स्वत: देखील मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. मात्र अजित पवार यांनी राजीनामा का दिला? असा प्रश्न साऱ्यांनाच पडला होता.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत याची अधिकृत घोषणा केली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, ‘अजित पवार यांनी आम्हाला पाठिंबा दिल्यामुळेच आम्ही सरकार स्थापन केलं. मात्र आज सकाळी अजित पवार यांनी आम्हाला राजीनामा देत असल्याचे सांगितले. काही वैयक्तिक कारणांमुळे त्यांनी हा राजीनामा देत असल्याचे ते म्हणाले’. अजित पवारांना तुरुंगात टाकू असे बोलणाऱ्या भाजपनं त्यांनाच कसं सोबत घेतलं या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी त्रोटक उत्तर दिलं. पाच वर्षात त्या प्रकरणांची चौकशी केली, पुढील चौकशी न्यायालयाच्या अखत्यारित येत असल्याने आम्ही त्यांना सोबत घेतल्याचं फडणवीस म्हणाले. अजित पवार हे पुन्हा शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेससोबत जाणार का? असं विचारलं असता या प्रश्नाचं उत्तर अजित पवारांनाच विचारा, असंही मुख्यमंत्री म्हणाले.
दरम्यान, अजित पवार यांनी आज पाठिंबा मागे घेतल्यानं आता आमच्याकडे देखील संख्याबळ उरलेलं नाही असं सागंत मुख्यमंत्र्यांनी देखील आपला राजीनामा राज्यपालांकडे सोपवला.


























































