जिवात जीव असेपर्यंत राष्ट्रवादीतच! अजित पवार यांनीच दिला वावड्यांना पूर्णविराम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कारण नसताना माझ्याबद्दल वावड्या उठवल्या जात आहेत… मी निक्षून सांगतोय, सगळय़ा बातम्या खोटय़ा आहेत… तुम्हाला ऍफिडेव्हिट करून देऊ का… की स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ. बस्स झालं, थांबवा आता या चर्चा… तुकडा पाडा!!

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज त्यांच्याबाबत उठणाऱ्या वावड्यांना स्वतःच पूर्णविराम दिला. ‘मी कुठेच जाणार नाही. मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच आहे. जिवात जीव असेपर्यंत… शेवटच्या श्वासापर्यंत मी राष्ट्रवादीतच राहणार!’ असे त्यांनी स्पष्टपणे सांगितल्याने गेल्या काही दिवसांपासून उडणारा धुरळा खाली बसला आहे. 40 आमदारांच्या सह्या मी घेतलेल्या नसून त्यात यत्किंचितही तथ्य नाही, असेही अजित पवार यांनी माध्यमांकडे स्पष्ट केले.

अजित पवार हे भाजपमध्ये जाणार असल्याचे वृत्त एका इंग्रजी दैनिकाने सोमवारी प्रसिद्ध केले होते. त्यावरून भाजप नेत्यांनीही उलटसुलट वक्तव्ये सुरू केली होती. त्यामुळे चर्चांना उधाण आले होते. आज अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्या बातम्या निराधार असल्याचे सांगितले. इतर राजकीय पक्षांचे नेते त्याबाबत वक्तव्ये करत असले तरी आपण मात्र काहीही बोलणार नाही, फक्त राष्ट्रवादीचे काम करत राहणार असे ते म्हणाले.

अजित पवार यांना राष्ट्रवादीचे 40 आमदार भेटले आणि त्यांनी सहमती पत्रावर सह्या केल्या अशीही वृत्ते टीव्ही वाहिन्यांवर सतत प्रसारित होत होती. त्यावर ते म्हणाले की, ‘ध’ चा ‘मा’ करू नका. जर काही झाले तर मीच सांगेन ना तुम्हाला… दुसऱ्या कुणाच्या ज्योतिषाची गरज नाही. आमदार मला कामासाठी भेटायला आले होते. तुम्ही माझ्यामागे कॅमेरे लावले? काहीही बातम्या करता? मी काय देशद्रोही आहे? असा संतप्त सवालही त्यांनी केला.

ते पुढे म्हणाले की, मंगळवार-बुधवार आमदारांच्या बैठका असतात. अनेक आमदार मंत्र्यांकडे किंवा मंत्रालयात कामाच्या निमित्ताने येत असतात. जे आमदार आले होते ते माझ्याकडे मी इथे आहे म्हणून भेटायला आले होते. ती नेहमीची पद्धत आहे. आपण कोणत्याही पत्रावर आमदारांच्या सह्या घेतलेल्या नाहीत, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

पत्रकारांचेही टोचले कान
अजित पवार यांनी यावेळी पत्रकारांचेही कान टोचले. ब्रेकिंग बातम्यांसाठी वरिष्ठांचा पत्रकारांवर दबाव असतो हे मान्य आहे, पण खातरजमा न करता बातम्या देऊ नका. विश्वासार्हता ठेवा. एखाद्याची बदनामी करू नका, असा सल्ला त्यांनी दिला.

आमदारांची बैठक बोलावलीच नाही
अजित पवार यांनी मंगळवारी आमदारांची बैठक बोलावली असल्याचेही वृत्त दिले जात होते. त्याबद्दलही अजित पवार यांनी स्पष्ट केले. मी कुठे आज आमदारांची बैठक बोलावली आहे, असा सवाल त्यांनी माध्यमांना केला. संजय शिंदे, देवेंद्र भुयार, शेखर निकम हे सर्व आमदार आज त्यांच्या कामासाठी इथे आले होते आणि कार्यक्रमपत्रिकेत त्यांना मी दोन दिवसांपूर्वी वेळ दिलेली आहे, बघा… असे त्यांनी सांगितले.

आमदारांच्या सह्या घेऊन मी करू काय?
आमदारांच्या सह्या घेतल्याच्या वृत्तावर अजित पवार यांनी यावेळी खुलासाही केला. ते म्हणाले की, आमचे 53 आमदार आहेत. मी 40 आमदारांच्या सह्या घेतल्याचे तुम्ही म्हणताय, तुम्ही एकाही आमदाराला खासगीत विचारून पाहा? बरे… मी सह्या घेऊन करू काय? सर्वोच्च न्यायालयातील निकालाचा शिंदे सरकारवर काहीही परिणाम होणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जरी न्यायालयाने पक्षांतरबंदी कायद्यात दोषी ठरवले तरी त्यांचे मुख्यमंत्रीपद जाणार नाही, असा दावा अजित पवार यांनी केला.

झेंडा काय कपाळावर लावून फिरू का?
अजित पवार यांच्या ट्विटरवरून पक्षाचे चिन्ह हलवले, अशा वृत्ताबद्दलही त्यांनी यावेळी खुलासा केला. माझ्या ट्विटरमध्ये उपमुख्यमंत्री असताना दाखवलं ते उपमुख्यमंत्री पद गेल्यावर काढले. बाकीचे आहे तसे आहे. त्यातून गैरसमज करून घेतला गेला. तुम्हीच म्हणता, झेंडा काढला… झेंडा काय कपाळावर लावून फिरू का?

सध्या माझ्याबाबत एवढं प्रेम का उतू चाललं आहे?
सध्या माझ्याबाबत एवढं प्रेम का उतू चाललं आहे, असा सवालही अजित पवार यांनी यावेळी केला. उलटसुलट बातम्यांमुळे संभ्रमात पडलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना ते म्हणाले की, बाबांनो! काही काळजी करू नका. विपर्यास करून बातम्या दाखवल्या जात आहेत. प्रत्येकाने आपापले काम करत जावा. आपापल्या भागात महाविकास आघाडी कशी वाढत जाईल यासाठी प्रयत्न करा.

तुमच्या मनात आहे ते आमच्या मनात नाही!
अजित पवार हे भाजपसोबत जात असल्याच्या बातम्यांमध्ये काहीही तथ्य नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही स्पष्ट केले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असे कोणतेही बंड होणार नाही, असे ठामपणे सांगतानाच, ‘जे तुमच्या मनात आहे ते आमच्या कुणाच्याही मनात नाही,’ असे शरद पवार प्रसारमाध्यमांना उद्देशून म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे महत्त्वाचे नेते कुठे आहेत याची पूर्ण कल्पना पक्षाध्यक्ष या नात्याने मला आहे. अजित पवार यांनी आमदारांची कोणतीही बैठक बोलवलेली नाही, असेही शरद पवार म्हणाले.