माझ्या निर्णयात कोणताही बदल नाही, शरद पवार यांनी केले स्पष्ट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर पहिल्यांदाच शरद पवार व अजित पवार यांच्यात शनिवारी एक गुप्त बैठक झाल्याचे समोर आले. ही बैठक एका बड्या व्यावसायिकाच्या घऱी पार पडली. त्यानंतर राजकीय चर्चांना देखील उधाण आलं असून त्यावरून वेगवेगळे तर्क वितर्क काढले जात होते. मात्र रविवारी शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांसमोर येत या भेटीबाबत खुलासा केला.

”अजित पवार हा माझा पुतण्या आहे. सध्या पवार कुटुंबात मीच वडिलधारी व्यक्ती आहे. त्यामुळे वडिलकीच्या नात्याने मी अजित पवार यांना भेटलो. त्यामुळे यावर अधिक चर्चा करण्याची गरज नाही”, असे शरद पवार म्हणाले.

पत्रकारांनी भाजपसोबत युतीबाबत विचारले असता शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस भाजपबरोबर कधीच जाणार नाही हे स्पष्ट केलं. ”भाजपसोबत युती ही आमच्या पक्षाच्या धोरणामध्ये बसत नाही. त्यामुळे आम्ही भाजपबरोबर जाणार नाही. आमच्या मधल्या काही सहकाऱ्यांनी वेगळी भूमिका घेतली आहे. त्यांच्यात परिवर्तन करण्याचा प्रयत्न आमचे हितचिंतक करत आहेत. त्यासाठी सुसंवाद साधण्याचा प्रयत्न होतोय. मात्र आम्ही भाजपसोबत जाणार नाही’, असे शरद पवार यांनी सांगितले.