सहकार चळवळ मजबूत करण्यासाठी आधी तळातील माणूस मजबूत करावा लागेल – शरद पवार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शंभर वर्षांपूर्वी राज्यात सहकार चळवळीची मुहूर्तमेढ रोवली असून त्या माध्यमातून अनेक सहकारी संस्था उभ्या राहिल्या आहेत. जनसामान्यांच्या विकासासाठी सुरू झालेली ही चळवळ आणखी पुढे घेऊन जायची असेल, मजबूत करायची असेल तर आधी तळातील माणूस मजबूत करावा लागेल, असे प्रतिपादन आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी केले. सहकार चळवळीकडून सर्वसामान्यांबरोबरच राज्यालाही मोठय़ा अपेक्षा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या शतकोत्तर दशकपूर्तीनिमित्त बँकेची मुहूर्तमेढ रोवणारे सर विठ्ठलदास ठाकरसी, प्राध्यापक धनंजयराव गाडगीळ आणि वैकुंठभाई मेहता यांच्या बँकेच्या सभागृहात लावलेल्या तैलचित्राचे अनावरण माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते झाले, त्याप्रसंगी शरद पवार बोलत होते. राज्य बँकेने गेल्या शंभर वर्षांत नागरी आणि ग्रामीण भागात परिवर्तनाचे मोठे कार्य केले आहे. या बँकेच्या उभारणीत ठाकरसी, गाडगीळ आणि मेहता यांचे काय योगदान आहे याचे आकलन पुढील पिढीला होईल असे पवार यांनी स्पष्ट केले. यावेळी बँकेचे प्रशासकीय अध्यक्ष विद्याधर अनास्कर, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, आरोग्यमंत्री राजेश टोपे, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱहे, मंत्री विश्वजीत कदम, अमित देशमुख, खासदार सुप्रिया सुळे, बँकेचे व्यवस्थापकीय संचालक अजित देशमुख आदी उपस्थित होते.

नवी दिशा देण्याची गरज – नितीन गडकरी

सर्वसामान्यांच्या विकासासाठी सहकारधुरिणांनी शंभर वर्षांपूर्वी सहकार चळवळ उभी केली आहे. ती आज स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी तिच्या मूळ उद्दिष्टाला बाधा येऊ न देता नवी दिशा देण्याची गरज असल्याचे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. दरम्यान, सहकारी बँका आणि पतसंस्थांकडे मोठय़ा प्रमाणात सुरक्षा ठेवी असून त्यांनी त्या वेगवेगळय़ा बँकांमध्ये गुंतवल्या आहेत. त्यावर त्यांना पाच टक्क्यांपर्यंत रिटर्न मिळते. पण याच सुरक्षा ठेवी त्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे गुंतवल्यास सात टक्के रिटर्न देणार असल्याचे गडकरी यांनी सांगितले.