
राष्ट्रवादीचे अध्यक्ष, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांना पोटात दुखू लागल्याने रविवारी ब्रिच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारांदरम्यान त्यांना पित्ताशयाचा त्रास असल्याचे निदान झाले. दरम्यान त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याचे समजते आहे. आमदार रोहित पवार यांनी याबाबत सोशल मीडियाच्या माध्यमातून ही बातमी दिली आहे.
रोहित पवार यांनी आपल्या फेसबुक अकाउंटवर याबाबत माहिती देताना लिहिलं आहे की, ‘ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये आदरणीय शरद पवार साहेबांवर यशस्वी शस्त्रक्रिया करून पित्ताशयातील खडे काढण्यात आले. सर्वांनाच काळजी वाटत असली तरी साहेबांची प्रकृती सुधारत असून त्यांना लवकर आराम मिळेल. शस्त्रक्रिया करणारे डॉ. मायदेव आणि त्यांच्या इतर सर्व सहकाऱ्यांचे मनापासून आभार.’
त्यांनी पुढे लिहिलं आहे की, ‘शस्त्रक्रियेनंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे साहेबांसह आम्ही पवार साहेबांची भेट घेतली. टोपे साहेबांना पाहून पवार साहेबांनी त्यांच्याकडून इतर विषयांसह राज्यातील कोरोनाच्या स्थितीची माहिती घेतली. हॉस्पिटलमध्ये असतानाही राज्याची काळजी करणाऱ्या या लोकनेत्याला पाहून तर मी थक्क झालो.’
‘ब्रीच कँडी’ हॉस्पिटलमध्ये आदरणीय Sharad Pawar साहेबांवर यशस्वी शस्त्रक्रिया करून पित्ताशयातील खडे काढण्यात आले….
Posted by Rohit Rajendra Pawar on Tuesday, 30 March 2021






























































