शिंदे गट आणि भाजपात वाचाळवीरांचा सुळसुळाट, अजित पवार यांचा हल्लाबोल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिंदे गट आणि भाजपमध्ये वाचाळवीरांचे प्राबल्य वाढले असून त्यामुळे मंत्रिमंडळाची प्रतिमा खराब होत आहे, असा हल्लाबोल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज केला.

‘तुम्ही काहीही बोलता…पण लोक ऐकून घेत असतात…पाहत असतात…लक्षात ठेवत असतात…काहीजण सहज बोललो असे म्हणत आहेत, पण तुम्ही सहज बोलायला काय नागरिक नाहीत, तुम्ही मंत्रीपदाची शपथ घेतलेली आहे…तुमच्यावर एक जबाबदारी दिलेली आहे,’ अशा शब्दांत त्यांनी वाचाळवीरांना खडे बोलही सुनावले. ‘या वाचाळवीरांना आवरा… त्यांना ताबडतोब सूचना द्या… महाराष्ट्राच्या परंपरेला गालबोट लावू देऊ नका,’ असेही यावेळी अजीत पवार मुख्यमंत्र्यांना उद्देशून म्हणाले.

अजित पवार यांनी आज जनता दरबारात सामान्य नागरिकांचे प्रश्न जाणून घेतले. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना सरकारमधील वाचाळ प्रवृत्तींचा समाचार घेतला. ते म्हणाले की, ‘मध्यंतरी अब्दुल सत्तार हे माझी बहिण सुप्रिया सुळे हिला काही बोलले. विनाशकाले विपरीत बुध्दी असेच त्यांना म्हणावे लागेल. मंत्री केले म्हणजे काही वेगळे झाले का. मंत्रीपदे येतात आणि जातात. कोण आजी असतो कोण माजी असतो. शेवटी आपण नागरिक असतो. संविधान, कायदा, नियम यांचा सर्वांनी आदर केला पाहिजे. पण सध्याच्या सरकारमधील काही लोक त्यात चुकत आहेत.’
दिवसाढवळ्या गोळीबार होतो… राडेबाजी होते…

सरकार काय करतंय

अंबरनाथमधील गोळीबार आणि ठाण्याच्या किसन नगरमधील हाणामारीच्या घटनेचा दाखल देत अजीत पवार यांनी यावेळी राज्य सरकारवर टीका केली. ‘अंबरनाथमध्ये बैलगाडा शर्यतीत दिवसाढवळ्या दोन गटांत गोळीबार झाला…सरकार काय करतंय? ठाण्याच्या किसन नगरमध्ये दोन गटांत राडा झाला. अशी राडेबाजी करून चालणार नाही. पोलिसांना इतर गोष्टी सोडून याकडेच लक्ष द्यावे लागेल. हे काय चाललंय?’ असा सवाल अजीत पवार यांनी सरकारला केला.

सरसकट सगळ्यांनाच संरक्षण काय देताय… हा जनतेचा पैसा आहे

ऊठसूट वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्याच्या सरकारच्या निर्णयांवरही अजीत पवार यांनी यावेळी टीकास्त्र्ा सोडले. किती लोकांना ‘वाय प्लस’ दर्जाची सुरक्षा पुरवली आहे याची माहिती माहितीच्या अधिकारात मागवली आहे असे सांगतानाच, त्यांना खरंच ‘वाय प्लस’ दर्जाची सुरक्षा आवश्यक आहे का? असा सवाल त्यांनी केला. ते पुढे म्हणाले की, ‘काहींचा तर 30 – 30 सरकारी गाडयांचा ताफा फिरत आहे. मी उपमुख्यमंत्री होतो तेव्हा जास्त गाडय़ा असल्या की नको म्हणायचो. हा पैसा तुमचा नाही, जनतेचा आहे. सरकारकडे टॅक्स रुपाने आलेला आहे. आमदारांचे, जनतेचे संरक्षण करणे ही सरकारची जबाबदारी आहे. परंतु सरसकट सगळ्यांना सरकारी संरक्षण? … काही माजी नगरसेवकांनाही संरक्षण दिले आहे. तो माजी झाला ना… त्याने गंभीर चुका केल्या असतील तर तो निस्तारेल… त्यासाठी सरकारी यंत्रणांचे संरक्षण देण्याची काय आवश्यकता?’ असा संतप्त सवालही अजित पवार यांनी केला.

प्रशासन पूर्वीप्रमाणे कामच करत नाही

सध्या प्रशासन पाहिजे तसे काम करताना दिसत नाही, असे अजीत पवार यावेळी म्हणाले. ‘32 वर्षाच्या कारकीर्दीत आपण वेगवेगळ्या महत्त्वाच्या खात्यावर, उपमुख्यमंत्री म्हणून काम केले आहे. त्यावेळी वेळेवर बैठका होत होत्या. बैठका रद्द होत नव्हत्या. अधिकाऱयांना ताटकळत बसावे लागत नव्हते. परंतु आता तसं अजिबात होत नाही.’

तज्ञांना घेऊन ‘हर हर महादेव’ चित्रपट पाहणार

‘हर हर महादेव’ या चित्रपटावरून सुरू असलेल्या वादाबद्दल बोलताना अजीत पवार यांनी तज्ञांना घेऊन आपण हा चित्रपट पाहू आणि मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन माहिती देऊ असे अजीत पवार यांनी यावेळी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची मोडतोड केलेली महाराष्ट्राला परवडणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. मी ‘हर हर महादेव’ चित्रपटाच्या काही क्लीप पाहिल्या आहेत. चित्रपट पाहिला नाही. वाघनख्यांनी शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा कोथळा काढला असे लहानपणापासून ऐकत आलो. परंतु या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज अफजलखानाला उचलून मांडीवर घेऊन कोथळा बाहेर काढताना दाखवले आहे. अशी इतिहासाची मोडतोड का करता? सरकारने यात हस्तक्षेप केला पाहिजे.’ असे सांगतानाच छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहे, हे लक्षात ठेवा, असा इशाराही अजित पवार यांनी दिला.

तुमच्या नाकर्तेपणामुळे प्रकल्प गेले

‘उदय सामंत यांचे स्टेटमेंट ऐकले की 30 दिवसात श्वेतपत्रिका काढून महाराष्ट्रातील उद्योग बाहेर का गेले हे सांगणार आहोत. जरुर सांगा.. उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काही आमच्या चुका असतील तर त्या समोर आल्या पाहिजेत. तुमच्या पाच महिन्याच्या नाकर्तेपणामुळे ते प्रकल्प आपल्याकडे राहण्याकरता जे काही महत्त्वाचे निर्णय घ्यायला पाहिजे होते ते तुमच्या पाच महिन्यांच्या नाकर्तेपणामुळे घेतले नसतील आणि म्हणून महत्त्वाचे प्रकल्प बाहेर गेले असतील तर तेही सांगा. महत्त्वाचे प्रकल्प बाहेर गेले त्यातील महत्त्वाचे उद्योगपती म्हणतात यापेक्षा मोठे प्रकल्प आणू… आणा ना कधी आणणार आहात….कुणी अडवले… तरुणांची नोकरीची वये जायला लागली आहेत.’ असे सांगतानाच, ही वस्तुस्थिती सांगणे हे विरोधी पक्षनेते म्हणून माझे काम आहे, असेही अजित पवार म्हणाले.

आनंदाचा शिधा आता मनस्तापाचा शिधा बनलाय

‘आनंदाचा शिधा आता जनतेला ‘मनस्तापाचा शिधा’ झाला आहे. अजून महाराष्ट्रातील लोकांना शिधा मिळालेला नाही. एका तर बहाद्दर मंत्र्याने सांगितले की, तुलशीचे लग्न होईपर्यंत दिवाळी असते तोपर्यंत देऊ. लग्न झाले तरी अजूनपर्यंत दिलेला नाही. ओल्या दुष्काळाकडे तर सरकारचे लक्षच नाही. अनेकदा आम्ही हे मुद्दे सरकारच्या निदर्शनास आणले. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना पत्रेही दिली पण काहीच झालेले नाही,’ असा आरोपही अजीत पवार यांनी केला.

पोलीस, मंत्रालयातील अधिकारी तणावाखाली आहेत

पोलीस आणि मंत्रालयातील अधिकारी सध्या प्रचंड तणावाखाली काम करत आहेत. वरिष्ठ पातळीवरून दबावाचे पह्न येतात असे पोलीसच सांगत आहेत. सचिव दर्जाच्या अधिकाऱयांना थेट मुख्यमंत्री कार्यालयातून आदेश येतात. ही अशीच परिस्थिती राहिली तर राज्याचे चित्र गंभीर व्हायला वेळ लागणार नाही, अशी भीती अजित पवार यांनी व्यक्त केली. पोलीस व सचिवांनी आपली भूमिका कणखरपणे मांडावी, असे ते म्हणाले.