
राष्ट्रवादी हा भरवशाचा पक्ष नाही. सकाळी एक, दुपारी एक आणि संध्याकाळी एक राजकारण करतात, असे वक्तव्य करणाऱया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी चोख उत्तर दिले आहे. चंद्रकांत पाटील हे झोपेतही राष्ट्रवादीचे नाव घेतात. त्यांचे बोलणे तुम्ही मनावर का घेता’, असा टोला त्यांनी लगावला आहे.
चंद्रकांत पाटील यांनी सोलापूर येथे राष्ट्रवादीबाबत वक्तव्य केले होते. राष्ट्रवादी हा कधीच भरवशाचा पक्ष नाही. सकाळी एक, दुपारी एक आणि संध्याकाळी एक राजकारण करतात.
एकवेळ काँग्रेस परवडली. काँग्रेसमधली सगळी व्यक्तिमत्त्वं सुसंस्कृत असतात, ते दरोडेखोर नसतात, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली होती. या टीकेला जयंत पाटील यांनी उत्तर दिले होते.
राष्ट्रवादीच्या सलगीच्या डावाला फसणार नाही
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सांगलीत भाजपशी सलगी करीत आहेत का, या प्रश्नावर चंद्रकांत पाटील यांनी हे वक्तव्य केले. ते पुढे म्हणाले, ‘राष्ट्रवादीला भाजपसोबत सलगी करायची असली तरी त्यांच्या या डावाला भाजप फसणार नाही.’




























































