शहापूरमध्ये राष्ट्रवादीला खिंडार,आमदार पांडुरंग बरोरा यांचा शिवसेनेत प्रवेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुंबई

शहापूरमध्ये राष्ट्रवादीला खिंडार पडले आहे. राष्ट्रवादीचे आमदार पांडुरंग बरोरा यांनी पंचायत समिती सदस्य तसेच शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना भवन येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधून त्यांचे शिवसेनेत स्वागत केले. कोणत्याही प्रलोभनापोटी नव्हे तर शिवसेनेवरील विश्वास आणि प्रेमापोटी पांडुरंग बरोरा आले आहेत. त्यांनी मांडलेले शहापूरमधील जनतेचे प्रश्न शिवसेना सोडवेल, असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिले.

पांडुरंग बरोरा यांच्याबरोबरच पालघरमधील पालघरमधील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष केदार काळे, तेथील नगराध्यक्षा उज्ज्वला काळे तसेच अन्य काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसेच शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.  या सर्वांचे उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेत स्वागत केले. युवक काँग्रेसचे प्रवक्ते आनंद दुबे यांनीही काही दिवसांपूर्वीच शिवसेनेत प्रवेश केला. त्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेना नेते-सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, आमदार रवींद्र फाटक, आमदार संजय शिरसाट, अमित घोडा, शांताराम मोरे, वस्त्राsद्योग महामंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटील, उपजिल्हाप्रमुख शंकर खाडे, तालुकाप्रमुख धिर्डे आदी उपस्थित होते.

शहापूरच्या नागरिकांचे प्रश्न सोडवणार

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोणताही दुजाभाव न करता शहापूर जिह्यासाठी कामे केली. याहीपुढे करीत राहतील. एखादा मतदारसंघ हातून गेला म्हणून दुजाभाव करण्याचे काम शिवसेनेकडून होणार नाही. मनामध्ये कुठली अढी ठेवून काम न करण्याचे पाप शिवसेना करणार नाही. शहापूरमधून पाण्याची लाइफलाइन येत असताना तिथल्या गावांतच पाणीटंचाई आहे. तिथे प्यायला पाणी नाही. या गावांना पाणी मिळावे या अपेक्षेने तुम्ही शिवसेनेत आला आहात. तो विश्वास शिवसेना नक्कीच सार्थ ठरवेल, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

विरोधी पक्ष नसला की जबाबदारी वाढते

आपण जनतेला हवं ते करू हा विश्वास आपल्याबद्दल वाटला. म्हणून जनतेने भरघोस आशीर्वाद दिला आहे. प्रत्येकाच्या मनामध्ये आणि हृदयामध्ये शिवसेना आहेच. पण शिवसेनेत येण्यासाठी वेळ यावी लागते. ती वेळ आता आली आहे. कारण शिवसेनेत केवळ विचार देणारी नाही तर विचारावर काम करणारी आहे. आज शहापूर पंचायत समितीत विरोधी पक्ष शिल्लक राहिला नाही. पण जेव्हा आपल्याला विरोध करणारं कुणी नसतं तेव्हा जबाबदारी अधिक वाढते. तेव्हा जनतेच्या प्रश्नांना अधिक महत्त्व देणे गरजेचे असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.

शहापूर भगवेमय करणार – पांडुरंग बरोरा

शहापूरमध्ये राष्ट्रवादीचा आमदार म्हणून असलो तरी तिथले पालकमंत्री शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी कधीच दुजाभाव न करता जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी कायम सहकार्य केले. कुटुंबात काँग्रेसचे वातावरण असले तरी लहानपणापासून बाळासाहेबांच्या भाषणांतून प्रेरणा मिळत होती. शिवसेना ही काम करणारी संघटना असल्याने शहापूरवासीयांचे प्रश्न  सोडवले जावेत या हेतूने या पक्षात प्रवेश करीत आहे. शहापूरमधील 287 गावांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न असो, येथे एमआयडीसी होऊन तरुणांना रोजगार मिळविण्याचा प्रश्न असो की येथे प्रशासकीय भवन, क्रीडा संकुल निर्मितीचा विषय हे शिवसेनेमुळे नक्कीच मार्गी लागतील. तेव्हा काम करताना काँग्रेसचे बंधन होते, पण आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधले आहे. त्यामुळे शहापूर भगवायुक्त करणार, असे पांडुरंग बरोरा म्हणाले.