
अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांच्या कार्यालयात भ्रष्टाचार होत असल्याची तक्रार महाराष्ट्र स्टेट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आली आहे. संघटनेने मुख्यमंत्र्यांना याबाबत पत्र लिहले असून या तक्रारीकडे राज्य सरकारने गांभीर्याने लक्ष न दिल्यास आंदोलन करून बंद पुकारण्याचा इशारा संघटनेने दिला आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक सवाल केला आहे.
अन्न व औषध प्रशासन खात्यातील हेराफेरीची मुख्यमंत्री चौकशी करणार का?
राज्यात गतिमान सरकारच्या काळात नेमकं काय चाललंय हे कळेनासं झालंय. अन्न व औषध प्रशासन खात्यात होणारा भ्रष्टाचार महाराष्ट्र ड्रगिस्ट असोसिएशनने मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिला आहे. यापूर्वीही कृषी… pic.twitter.com/d836RuTEDy
— NCP (@NCPspeaks) April 19, 2023
”राज्यात गतिमान सरकारच्या काळात नेमकं काय चाललंय हे कळेनासं झालंय. अन्न व औषध प्रशासन खात्यात होणारा भ्रष्टाचार महाराष्ट्र ड्रगिस्ट असोसिएशनने मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिला आहे. यापूर्वीही कृषी विभागाकडून सिल्लोड कृषी प्रदर्शनासाठी बेकायदा निधी गोळा करण्यात आल्याची बातमी समोर आली होती. यात भर म्हणून अन्न व औषध प्रशासनाचा भ्रष्टाचार समोर आला आहे. गतिमान सरकार अशी भ्रष्टाचार वाढीची कामं गतीने करत असेल तर जनतेने सरकारवर विश्वास कसा ठेवायचा हा मोठा प्रश्न आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काही ठोस पावले उचलणार का याकडे राज्यातील जनतेचे लक्ष लागले आहे. आधी कृषी खात्यात घोटाळा आता औषध खात्यात घोटाळा अशा वाटचालीतून ‘घोटाळे वेगवान, राज्यकर्ते धनवान’ हे नवे घोषवाक्य राज्य सरकारला वापरावे लागेल” अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे.


























































