निवडणुकीनंतर एनडीएचेच सरकार स्थापन होणार; अकाली दलाचाही दावा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

लोकसभा निवडणुकीनंतर केंद्रात एनडीएचे सरकार स्थापन होईल असा दावा अकाली दलाचे ज्येष्ठ नेते नरेश गुजराल यांनी केला आहे. मात्र, या निवडणुकीत भाजपला स्वबळावर बहुमताचा आकडा गाठता येणार नाही, अशी शक्यता त्यांनी वर्तवली. मात्र, मित्रपक्षांच्या मदतीने एनडीएचेच सरकार स्थापन होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, सहकारी, मित्रपक्षांना एकत्र घेत सरकार चालवण्याचा अनुभव भाजपला आहे असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच भाजपच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून केले आहे. त्यामुळे एनडीएचीच चर्चा जोरदार सुरू आहे.

2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकांपेक्षा ही निवडणूक वेगळी आहे. 2014 मध्ये मोदी लाट होती. या निवडणुकीत कोणतीही लाट नसून मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगडसह इतर राज्यातही राजकीय समीकरणे बदलली आहेत. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगडमध्ये काँग्रेसचे सरकार स्थापन झाले आहे. तेथे भाजपचा जनाधार घटला आहे. तसेच उत्तर प्रदेशात सपा-बसपा आघाडीने भाजपसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. या सर्व गोष्टींचा विचार करता भाजप स्वबळावर बहुमताचा 272 चा आकडा गाठू शकणार नाही, असे गुजराल म्हणाले. मात्र, केंद्रात एनडीएचेच सरकार स्थापन होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. निवडणुकीनंतर केंद्रात भाजप सहकारी पक्षांच्या सहकार्याने सरकार स्थापन करेल. केंद्रात एनडीएचेच सरकार स्थापन होईल, असा विश्वास भाजपचे सरचिटणीस राम माधव यांनी व्यक्त केला होता.

अकाली दलाला पंजाबमध्ये जास्त जागा मिळतील, असा दावाही गुजराल यांनी केला. पंजाबमधील जनता कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्या सरकारला कंटाळली आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे दिलेले आश्वासन सरकारने पाळले नाही. जनतेला पायभूत आणि मूलभूत सुविधा पुरवण्यातही काँग्रेसचे सरकार कमी पडल्याचे गुजराल यांनी सांगितले. काँग्रेसला जनता कंटाळल्याने पंजाबमध्ये अकाली दलाला जास्त जागा मिळतील असेही ते म्हणाले.