मुंबई-ठाण्यात अब की बार महायुतीच! मतदानाच्या वाढलेल्या टक्क्याने आघाडीत धास्ती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
bjp-shivsena

संदेश सावंत । मुंबई

लोकसभा निवडणुकीच्या मतदानापूर्वी मुंबई जिंकण्याची स्वप्ने काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या नेत्यांकडून रंगवली जात होती. मात्र 2019 मध्ये मतदानाची वाढलेली टक्केवारी आणि 2014 च्या निवडणुकीत शिवसेना-भाजप उमेदवारांनी घेतलेली लाखोंची आघाडी याचा विचार करता मुंबई-ठाण्यात अब की बारदेखील महायुतीचाच जोर कायम राहणार हे जवळपास निश्चित. मुंबई-ठाण्यातील वाढलेल्या मतदानाच्या टक्केवारीमुळे आघाडीच्या गोटात मात्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

लोकसभेच्या 2009 आणि 2014 च्या निवडणूक निकालावर नजर टाकल्यास काँग्रेस-राष्ट्रवादीच्या परंपरागत मतदानात फारसा फरक पडलेला दिसत नाही. शिवसेना-भाजपच्या परंपरागत मतदानाबरोबर प्रत्येक मतदारसंघात लाखाच्या वर नवीन मतदानाची भर पडली आहे. विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील युतीची ताकद व संघटनात्मक बांधणीचा विचार करता मुंबई-ठाण्यात महायुतीचाच जोर कायम राहणार असल्याचे दिसत आहे.

उत्तर मुंबईत भाजपचे गोपाळ शेट्टी व काँग्रेसच्या उर्मिला मातोंडकर यांच्यात थेट लढत होत आहे. मातोंडकर यांच्या उमेदवारीमुळे शेट्टी यांच्यासाठी सहज सोपी असणारी निवडणूक जरा अवघड झाली असली तरी मागील निवडणुकीत महायुतीला मिळालेली चार लाखांहून अधिक मतांची आघाडी भरून काढणे काँग्रेसला सोपे नाही.

उत्तर-पश्चिम मुंबईत शिवसेना उमेदवार गजानन कीर्तिकर यांच्या विरोधात काँग्रेसचे संजय निरुपम निवडणुकीच्या रिंगणात असले तरी तरी मोठय़ा मताधिक्याने येथून पुन्हा कीर्तिकर यांचा विजय होईल. शिवसेनेचा बालेकिल्ला असणाऱया दिंडोशी, जोगेश्वरी व अंधेरी पूर्वमध्ये झालेले भरभरून मतदान महायुतीच्या पारडय़ात पडेल.

उत्तर-मध्य मुंबईत भाजपच्या विद्यमान खासदार पूनम महाजन व काँग्रेसच्या प्रिया दत्त यांच्यात थेट लढत होत असून पक्षांतर्गत नाराजीचा फटका दत्त यांना बसण्याची शक्यता अधिक आहे. मागच्या निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या जवळपास पावणेदोन लाख मतांची आघाडी कमी करणे प्रिया दत्त यांच्यासाठी खूपच अवघड आहे.

उत्तर-पूर्व मुंबईत भाजपने विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांच्याऐवजी मुंबई महापालिकेतील अभ्यासू नगरसेवक मनोज कोटक यांना निवडणुकीत उतरवले आहे. तर राष्ट्रवादीने माजी खासदार संजय दिना पाटील यांना उमेदवारी दिली आहे. महायुतीचा गड असणाऱया या भागात मागच्या निवडणुकीत मिळालेल्या मताधिक्याचा विचार केल्यास पाटील यांचा निभाव लागण कठीण आहे.

दक्षिण-मध्य मुंबईत शिवसेनेचे विद्यमान खासदार राहुल शेवाळे व काँग्रेसचे माजी खासदार एकनाथ गायकवाड यांच्यात लढत होत आहे. या भागातील शिवसेनेची संघटनात्मक बांधणी व शेवाळे यांचा दांडगा जनसंपर्क लक्षात घेता मागच्या निवडणुकीत येथून मिळालेले 1 लाख 38 हजारांहून अधिक मताधिक्य कमी करणे काँग्रेसला शक्य नाही.

दक्षिण मुंबईतून शिवसेनेने विद्यमान खासदार अरविंद सावंत व मिलिंद देवरा यांच्यात लढत होत आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर निरुपम यांच्याकडील मुंबई काँग्रेसचे अध्यक्षपद काढून घेऊन देवरा यांच्याकडे जबाबदारी दिली आहे. यामुळे या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या भागातील महायुतीची ताकद व शिवसेना-भाजपची संघटनात्मक बांधणी विचारात घेता देवरा यांना ही लढाई जडच जाईल असे एकंदर चित्र आहे.

मतदारसंघ 2014 चे मताधिक्य 2019 चे वाढीव मतदान

उत्तर मुंबई 446582 41482
उत्तर-पश्चिम 183028 41358
उत्तर-पूर्व 317122 40376
उत्तर-मध्य 186771 55558
दक्षिण-मध्य 138180 26649
दक्षिण 128564 19753
ठाणे 281299 111725
कल्याण 250749 64370
भिवंडी 109450 127074
पालघर 239520 208528

ठाणे-पालघर जिह्यात महायुतीचा दबदबा

ठाणे जिह्यातील ठाणे लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे विद्यमान खासदार राजन विचारे रिंगणात असून राष्ट्रवादीचे आनंद परांजपे येथून नशीब अजमावत आहेत. मात्र या भागातील शिवसेनेची संघटनात्मक ताकद पाहता राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा निभाव लागणे कठीण आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे डॉ. श्रीकांत शिंदे रिंगणात असून त्यांना मागील वेळी येथून मिळालेली जवळपास अडीच लाख मतांची आघाडी कमी करणे राष्ट्रवादीच्या नवख्या उमेदवाराला शक्य नाही. भिवंडीत भाजपचे विद्यमान खासदार पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत. त्यांना मागील निवडणुकीत मिळालेली एक लाखाहून मतांची आघडी व यावेळी झालेले जवळपास सवा लाख अधिक मतदान यामुळे ही लढत अटीतटीची होईल, मात्र महायुतीच्या संघटनात्मक बांधणीच्या जोरावर पाटील बाजी मारतील. पालघर लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार राजेंद्र गावीत शिवसेनेकडून निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. या भागातील महायुतीची ताकद व माजी खासदार दिवंगत चिंतामण वनगा यांच्या पुण्याईमुळे गावीत काँग्रेस आघाडीचा घटक असणाऱया बहुजन विकास आघाडीच्या उमेदवारावर मात करतील.